खाणावळ : चविष्ट जेवणासाठी ते वाट पाहत आहेत


  बावीस वर्षांच्या सोमनाथचा मुंबईत पहिलाच दिवस होता तो. कामाधंद्याच्या शोधातचं तो इथे आला होता. गावी म्हातारे आईवडिल आणि लहान बहीणीचे शिक्षण यासाठी पैसा तर जोडावा लागणार होता. गावी राहून तर ते शक्यच झालं नसतं. मुंबईत काही ना काही काम मिळेलच, या अपेक्षेनेच फक्त वाटखर्चीचे पैसे कसेबसे जोडून सोमनाथने मायानगरीत पाऊल ठेवलं होतं.

   जम बसेपर्येंत घरी उदरनिर्वाहासाठी सर्व शिल्लक ठेऊन तो मोकळाच आला होता. खिश्यात एक रुपया देखील नव्हता. दिवसभर सगळीकडे विचारपूस करून तो थकला परंतु काहीच काम मिळाले नव्हते. अंधार पडायला सुरुवात झाली होती. सकाळपासून पोटात अन्नाचा एक कणदेखील नव्हता. फिरता फिरता तो एका झोपडपट्टीसारख्या दिसणाऱ्या भागात आला.

 तिथे रस्त्याला लागूनच खाण्यापिण्याच्या बऱ्याच गाड्या उभ्या होत्या. छोट्यामोठ्या कामाच्या बदल्यात आजच्यापुरते काही खायला मिळाले तरी पुष्कळ, असा विचार करत सोमनाथ प्रत्येक गाडीवर जाऊन कामासंबंधी विचारू लागला.

 जो तो मुंबईत प्रथम स्वतःचा विचार करतो, दिवसभर मेहनत करायची आणि दोन पैसे जमा ठेवायचे. लोअर मिडलक्लास किंवा अगदीच गरीब म्हणता येईल अश्या वर्गाचा हा पहिला नियम. साहजिकच कोण सोमनाथवर उपकार करून मिळणाऱ्या वाट्यात हिस्से पाडील..?

 सगळीकडून नकाराची घंटा ऐकत शेवटी सोमनाथ त्या पावभाजीच्या ठेल्यावर गेला.

 "काका.. असेल ते काम करीन, पैसे नको.. फक्त खायला द्या काहीतरी.." सोमनाथ रडवेल्या आवाजात आणि घामेजलेल्या चेहऱ्याने म्हणाला.

 पावभाजीवाल्या रफिकला खरंच त्याची दया आली की कुणास ठाऊक.. पण त्याने भांडी धुण्याची जबाबदारी सोमनाथवर सोपवली.

 "देख छोटे, आज मेरा भाई नही आया इसीलिये मैं तुझे काम दे रहा हूं.. कल से तु अपना इंतेजाम कर लेना.. चल अभी अच्छे से प्लेट धो.. धंदा बंद करते वक्त पावभाजी खिला दूंगा.." रफिक व्यावहारिक भाषेत म्हणाला.

  मरगळ झटकून सोमनाथ उत्साहाने भांडी विसळू लागला. पावभाजीवाल्याच्या हातात जादू असावी बहुधा, गिऱ्हाईक नुसते तुटून पडले होते.. गाडीवर एकाचवेळी पाचसहा जण तरी होतेच.. सोमनाथ बिचारा पुढ्यात येतील तितकी भांडी धुण्याचे काम प्रामाणिकपणे करत होता. पावभाजीचा काय खमंग वास सुटला होता.. त्या वासानं सोमनाथचं सारं चित्त तिकडेच लागलं होतं.

हो हो म्हणता म्हणता रात्रीचे अकरा वाजले.. तेव्हा कुठे सोमनाथच्या कामात खंड पडला. धंदा बंद करण्याची वेळ झाली होती. आज चांगलीच कमाई झाली होती. सोमनाथसाठी अगोदरच काढून ठेवलेल्या पावभाजीची प्लेट रफिक त्याला देणारच होता की तेवढ्यात त्याचं रोजच गिऱ्हाईक आलं. आज जरा उशीरचं झाला होता त्याला यायला.

 आता हातात भरलेली प्लेट असताना त्याला नाही म्हणायची सोयच नव्हती. नाईलाजाने रफिकने ती प्लेट शेवटच्या गिऱ्हाईकाला दिली आणि गल्ल्यातले तीस रुपये काढून सोमनाथला देऊ केले. भांडी घासल्याचा मेहनताना होता तो.. सगळा प्रकार सोमनाथच्या समोरच घडला होता. वर आता पावभाजी शिल्लक नव्हती. सोमनाथने शांतपणे पैसे घेतले आणि तो तिथून निघाला.

 पण जेवणाची चिंता त्याला अजून सतावत होती. आसपास सगळं काही बंद झालेलं दिसत होतं. कुठे काही खायला मिळेल या आशेने सोमनाथ दिशा मिळेल तिकडे चालत राहीला.

 झोपडपट्टी सोडून बराच पुढे आलेला सोमनाथ  रस्त्यावर सगळीकडे नजर ठेवून होता. तसा तो मुंबईत नवीन असला तरी चौकस आणि हुशार होता. पण कधीकधी परिस्थिती माणसाला हतबल करून सोडते. रस्ता अनोळखी असला तरी सोमनाथला दूरवर चमकणाऱ्या दिवे दिसत होते. मुंबई कधीही झोपत नाही, हे त्याने एकदा ऐकले होते. कदाचित तिकडे जेवणाची काहीतरी सोय होईल, या अपेक्षेने तो प्रकाशाच्या दिशेने जाऊ लागला.

 काही अंतरावर पुढे जाणारी वाट संपली होती. एक भलंमोठं गटार त्याच्या स्वागतासाठी समोर होतं. अंधारात सुरुवातीला तर त्याला ते दिसलंच नव्हतं. अगदी थोडक्यात त्यात पडता पडता तो वाचला. टाचा उंच करून तो आसपासच्या परिसरावर नजर टाकू लागला. दिव्यांचा अंधुक प्रकाश तर दिसत होता परंतु वाट त्याला स्वतःलाच बनवायची होती.

 हताश होत मग सोमनाथने गटाराच्या कडेने चालायला सुरुवात केली. सुरुवातीला गटार, मग एक कचरापट्टी आणि त्यानंतर पुढ्यातल्या मोठाल्या पाईपलाईनच्या खाली घुसून एकदाचा सोमनाथ बाहेरच्या मुख्य रस्त्यावर आला. अंधारात त्यानं एवढं दिव्य कसं पार केलं, त्याचं त्यालाच ठाऊक.

 पण बाहेर येताच त्याला जवळच एक ढाबा दिसला. सोमनाथच्या चेहऱ्यावर नकळत खळी उमटली. लगबगीने तो ढाब्याजवळ गेला आणि बाहेर लावलेलं रेटकार्ड वाचू लागला. तिथल्या किंमती पाहून तर त्याच्या पोटात गोळाच आला. मुंबईत कितपत खस्त्या खाव्या लागणार आहेत, याची प्रचिती पहिल्याच दिवशी येऊ लागली होती. त्याचा पुन्हा हिरमोड होऊ लागला होता.

 ढाब्याच्या बाहेर असलेल्या दिव्याच्या प्रकाशात त्याने पाहीले. आसपास बरीच झाडी पसरली होती. दुरपर्येंत दुसरं कुठलंही हॉटेल नव्हतं. पुढे तर अंधार इतका होता की थोड्या अंतरावर रस्तासुद्धा नीट डोळ्यांना दिसत नव्हता. भूक तर खूप लागली होती. आता काय करायचे, या विवंचनेत असतानाच त्याला कुणीतरी पुकारल्याचा भास झाला.

 पहिल्यांदा तर ते शब्द नीट ऐकू आले नाहीत. सोमनाथने कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. 

 "जेवण पाहिजेल.." बाजूच्या झाडीतून एक आवाज आला. तिथली पानं सळसळत होती. कुणीतरी डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत होतं का..?

 सोमनाथने तिकडे दुर्लक्ष केले.

 "कमी पैश्यात भरपेट जेवण मिळेल.. जवळच खाणावळ आहे..." तो चमत्कारिक इसम झाडीतून बाहेर पडत म्हणाला.

 हा माणूस झाडीतून बाहेर पडलाय.. मला काही धोका तर नाही ना याच्यापासून.. मुंबईत चोरसुद्धा खूप असतात.. मला झाडीत न्यायचा आणि खिश्यातले पैसेपण घ्यायचा... सोमनाथच्या मनात विचार आला.

  "मी आत्ताचं जेवून आलो तिथून.. आपल्यासारख्याला ढाबा काय परवडणार.. खाणावळीमध्ये वीस रुपयात पोटभर जेवलो मग.. बघ जायचं असेल तर इथून जवळच आहे.. लाईट दिसेल तिथली.." असं म्हणत तो इसम सोमनाथच्या बाजूने निघून गेला.

 'वीस रुपयांत जेवण.. म्हणजे दहा रुपयेसुद्धा वाचतील माझे.. आणि तिथंच बघू कुणाला विचारून.. कामाची कायतरी सोय झाली की अजून चांगलं..' सोमनाथने विचार केला. नाहीतरी त्याच्या मनात आलेली पहीली शंका साफ चुकीची ठरली होती. झाडीतून बाहेर आलेला इसम तर तिथून निघूनही गेला होता.

 नकळत मग सोमनाथची पावले झाडीच्या दिशेने वळली. थोडंसं आत जाताच त्याला काही अंतरावर पिवळसर बल्बचा प्रकाश दिसला. हा.. तिचं असणार खाणावळ.. सोमनाथला आता भुकेवर नियंत्रण ठेवणं अशक्य वाटू लागलं होतं. तो वेगाने त्या खाणावळीकडे जाऊ लागला.

  काहीसं कच्च बांधकाम होतं ते.. जुनाट घरासारखंच.. पाचसहा लाकडी टेबल आणि खुर्च्या ओळीने मांडल्या होत्या. बल्बच्या पिवळ्या प्रकाशात खोली उजळून निघाली होती. सोमनाथ सरळ आत शिरला आणि एका खुर्चीवर जाऊन बसला. त्यानं आसपास पाहीलं.. पण तिथं जेवण करताना कुणी दिसत नव्हतं. काहीसा विचार करत सोमनाथ खुर्चीवरून उठणारच होता की तेवढ्यात कोपऱ्यातल्या ओट्याच्या दिशेने एक कापरा आवाज ऐकू लागला.

 "कोण.."

 सोमनाथने तिकडे पाहीले.. काळ्या ओट्यामागून एक म्हातारी उभी राहीली. चेहऱ्यावर असंख्य सुरकुत्या पण नजर मात्र बेरकी होती. शरीराने काटक असलेली म्हातारी चांगलीच खमकी दिसत होती. खाणावळ बहुतेक तिचीच असावी.

 "अ.. जेवण पाहिजे.." सोमनाथ हलक्या स्वरांत उद्गारला.

 "जेवण व्हयं.. हो हो.. करायचं जेवणाचीचं तयारी करायचीय.." म्हातारी आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणखी वाढवीत म्हणाली.

 सोमनाथच्या मनात जरा धाकधूक होतीच पण भुकेपुढे त्याने सपशेल शरणागती पत्करली.

 म्हातारी पुन्हा काळ्या ओट्यामागे गुडूप झाली. तितक्यात सोमनाथची नजर मागच्या बाजूच्या दरवाज्याकडे गेली. गेली म्हणण्यापेक्षा त्याला तिकडे पाहावे लागले, असं म्हणावे लागेल. कारण त्या दरवाज्यापलीकडून कुणाचीतरी खसखस ऐकू येत होती. की कुणीतरी हमसून हमसूम श्वास घेण्याचा प्रयत्न करत होतं..?

 सोमनाथला हे सगळे विचित्र वाटत होते. जेवण येईपर्येंत एकदा ही खाणावळ पूर्ण पाहूनच घेऊ, असा विचार करत तो उठला. सुरुवात म्हातारीपासूनच करायची त्याने ठरवले.. तेवढंच काही ओळख वगैरे वाढेल.. या आशेने सोमनाथ काळ्या ओट्याकडे एक एक पाऊल टाकू लागला. 

  मागच्या दाराकडची खसखस बंद झाली होती. खाणावळीत आता स्मशानशांतता पसरली होती. सोमनाथच्या मनावरही एकप्रकारचं दडपण येऊ लागलं होतं. ते दूर करणं आवश्यक होतं.

 "आजी.. काय काय बनवता तुम्ही.." पुढे येत सोमनाथने विचारलं तर खरं.. पण ओट्यापलीकडे म्हातारी कुठे होती. सोमनाथला आश्चर्याचा धक्काच बसला. अरे ही म्हातारी आत्ता तर खाली बसली होती... मनात शंका येऊ लागली होती. सोमनाथ पुढे जाऊन शोध घेणारच होता.

 तितक्यात अगदी त्याच्या पाठीमागेच कुणाचीतरी चाहूल जाणवली.

 "जेवण करायचाय.." म्हातारीचा कापरा आवाज ऐकू आला. सोमनाथ झटकन मागे वळला.. त्याच्या डोळयांत काहीशी भीती दाटली होती.

 "आजी.. तुम्ही इकडे कश्या..." सोमनाथने घाबरतच विचारले.

 "खाणावळ माझी.. मग मी न्हाय तर कोण असल इथं.." म्हातारी थंडपणे म्हणाली.

 "नाही.. तसं नाही.. जाऊ दे.." सोमनाथ कसल्याश्या दडपणाखाली आला होता.

 तितक्यात मागच्या दरवाज्यापलीकडून पुन्हा कसलातरी आवाज ऐकू आला.

 असं वाटतं होतं की, लाकडी वस्तूवर काहीतरी आपटलं जात होतं..

 "हे.. काय... कोण आहे तिकडं.. आवाज कसला.." सोमनाथने म्हातारीला विचारले.

 "त्यो आवाज.. ह्ह ह्ह.. जेवण बनतंय.. तूला बघायचंय तर बघ जा.. आमचं जेवण लय चविष्ट असतंय.." म्हातारी थरथरत म्हणाली.

 खरंतर सोमनाथ मनातून प्रचंड घाबरला होता. ही जागाच त्याला तितकीशी पटत नव्हती. त्यात ही म्हातारी.. एखाद्या कोड्यासारखी समोर आली होती. हा पण म्हातारीने अजूनतरी कोणता वाईट हेतू जाणवू दिला नव्हता. त्याने विचारलेल्या प्रश्नांची ती समाधानकारक उत्तरं देत होती.

 'ती बोलतेय तर एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे.. असं पण जेवण बनत आहे.. ते आल्यावरच जेवायला मिळेल.. आतमध्ये खाणावळीचं अजून कुणीतरी असेल. मग बघून तरी घेऊ कसं बनवतायत.. आणि जर त्यांना गरज असेल तर कामाचं पण विचारून घेऊ..' सोमनाथ मनातल्या मनात ढोबळ विचार करत होता.

 'भूक आणि काम' या दोन गोष्टींत अडकलेलं त्याचं मन इतर कसलाच विचार करत नव्हतं.

 म्हातारीने पुन्हा खुणावताच सोमनाथ मागच्या दरवाज्याकडे गेला. हलकासा धक्का देताच दार उघडलं गेलं.

  सोमनाथनं पाहीलं,

 ते चौघे होते.. पाठमोरे बसलेले.. सोमनाथ आत गेला आणि बारकाईने पाहू लागला. पुन्हा मागून चाहूल जाणवली. त्याला वाटले म्हातारी असेल.. म्हणून तिकडे दुर्लक्ष करीत तो पाठमोऱ्या बसलेल्या त्या चौघांजवळ गेला आणि त्याला धक्काच बसला.

 एका मोठया लाकडी ओंडक्यावर तिच म्हातारी डोळे टक्क उघडे ठेऊन आडवी पडली होती. तिच्या आसपासचे चौघेही हत्यार घेऊन वाट पाहत होते.. तिच्या एका इशाऱ्याची.. ते दृश्य पाहून सोमनाथ अक्षरशः हादरलाच..

 म्हातारी समोर आहे, मग मागे कोण आहे..? पाहण्यासाठी सोमनाथ मागे वळला.

 दरवाज्यात तोच इसम विकट हास्य करत उभा होता ज्याने या खाणावळीबद्दल सोमनाथला सांगितले होते. आपल्याला फसवून इथे आणल्याचे सोमनाथच्या लक्षात आले. पण अजून खरा धक्का तर लागणे बाकी होते..

 "मला बाहेर जाऊ दे.. मी काय वाकडं केलंय तुमचं.. मी फक्त खाणावळ समजून जेवायला आलो होतो.. जाऊ दे मला.." सोमनाथ गयावया करू लागला.

 तेवढ्यात लाकडी ओंडक्यावर झोपलेली म्हातारी हळूहळू उठू लागली.. तिचा पांढराफट्ट पडलेला चेहरा भेसूर वाटत होता.. सोमनाथला तिच्याकडे पाहवतच नव्हते. नजर खाली ठेऊनच तो थरथर कापत होता.

 "ही खाणावळचं आहे.. पण फक्त आमच्यासाठी.. तूला कसं सोडायचं.. आमच्या आजच्या जेवणात तूच तर आहेस.. हीहीहीहीही..." म्हातारीच्या शब्दांनी जणू सोमनाथच्या मनावर आघात केला. आधीच प्रचंड भीतीच्या छायेखाली असल्याने तो खाली कोसळला.

 शुद्ध हरपण्याआधी शेवटचं त्याच्या डोळ्यांना दिसले.. सहा महाभयंकर राक्षस आपले सुळे दाखवत त्याच्या शरीराचे लचके तोडण्यास पुढे सरसावले होते. त्या राक्षसांचा स्पर्श होण्याआधीच शेवटच्या क्षणी विस्फारलेले सोमनाथचे डोळे अलगद मिटले.


समाप्त
निलेश देसाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ती वाट दूर जाते | ग्रामीण भयकथा

  "अहा.. ह्ह.. हं सर्जा... अहं अहं अहं.. व्ह राजा.. हिकडं हिकडं.. आरं कुठं बांधाच्या कडंनं जातुयस... ये मधी.. हम. हा.. हा.....

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. enjoynz द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.