नेत्रा काणेकर भाग एक : सुदर्शन कथा
प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, असं म्हणतात. पण म्हणुन काय वाटेल ते करावं का माणसाने. एखाद्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रयत्नांची आणि उपायांची काहीतरी मर्यादा हवी की.. नाहीतर कुणीही उठसुठ त्याच्या मनाला पटेल ते करत जाईल, आपल्या सुखासाठी इतरांच्या आयुष्याची वाताहत करेल.
आणि जर अश्या अविचारी चेतनांना अमानवी शक्तीची जोड मिळाली तर नक्कीच हाहाकार माजेल..
सदर कथा अश्याच एका अमानवी शक्ती आणि सुदर्शन यांच्यातील संघर्षावर आधारीत आहे. सुदर्शनची कथा म्हटल्यावर ती प्रत्यक्ष साक्षीदाराच्या तोंडून ऐकणेच योग्य, नाही का..?
चला तर मग वेळ न दवडता ऐकूया नवीन कथा 'नेत्रा काणेकर.. " मास्तरांच्या शब्दांत..
नमस्कार, मी मास्तर.. सुदर्शनसोबत असतो तोच.. सुदर्शनचे नाव सांगितल्याबरोबर तुम्ही मला ओळखले असेलच.. (हसतो) त्याचे कारनामेच तसे आहेत. तर तुम्ही ऐकलेल्या सुदर्शनच्या किस्यांत भर म्हणून आज आणखी एक किस्सा तुम्हाला सांगतो.
शाळेत शिकवताना माझ्या विद्यार्थ्यांवर माझं नेहमीच बारीक लक्ष असायचं. म्हणजे कोणता विद्यार्थी कुठल्या वर्गात बसतो इथपासून ते अमुक तमुक विद्यार्थी हुशार अथवा ढ आहे इथपर्येंत मला बऱ्यापैकी माहीती होती. काही विद्यार्थी तर माझ्या खास नजरेत होते... असतातच.. प्रत्येक मास्तराने हेरलेले आणि त्यांच्या खास मर्जीतले काही हिरे प्रत्येक शाळेत असतात. याचं कारण म्हणजे मास्तरांनी इतर मुलांहून त्यांच्यात काहीतरी वेगळे पाहिलेले असते. असो, तर हा किस्सा आहे माझ्या ओळखीतल्या एका अतिशय हुशार विद्यार्थिनीचा.
नेत्रा काणेकरचा...
सहामाही परीक्षा संपल्या होत्या. काहीसा दिवाळीच्या आसपासचा हंगाम होता तो. दहावी अ वर्गातली नेत्रा म्हणजे शाळेतली टॉपर. नव्वद टक्क्यांच्या खाली कधी आली नव्हती ती.
त्या दुपारी शाळेतल्या मुलांचे पेपर तपासण्याचे काम मी यांत्रिकपणे करत होतो. समोर आलेला पुढचा पेपर मी अत्यंत उत्साहाने तपासण्यासाठी हातात घेतला आणि मग.. हा नेत्राचा पेपर...? कपाळावर आठ्या पाडून मी आश्चर्य व्यक्त करत होतो. पुढची कितीतरी मिनिटे तो पेपर माझ्या हातात तसाच राहीला. एक पानदेखील उलटू शकलो नाही मी.. त्याचा काही उपयोगच नव्हता. पहिल्या पानाव्यतिरिक्त आत काहीच लिहिले नव्हते. पहिल्या पानावर तरी काय होते तेव्हा.. फक्त तो मजकूर...
"मी फसलेय... कश्यात ते माहीत नाही... आजकाल अभ्यासावरून बाबा खूप ओरडतात. मला वाईट वाटते.. मला कळतेय की काहीतरी चुकीचे होतेय.. पण काय तेच कळत नाही.. बाबांनी माझ्यावर असं चिडलेलं पाहवत नाही.. असं का होतेय.. आजकाल कश्यात लक्ष लागत नाही.. नेहमी असं वाटतं कुणीतरी खुणावतंय.. मला बाहेर बोलावतंय..."
मजकूर एवढाच होता. आणि फक्त तेवढंच वाचून मला पुरेसा धक्का बसला होता.
हे काय विचित्र लिहून ठेवले आहे.. नेत्रासारखी हुशार मुलगी.. परीक्षेच्या पेपरमध्ये काय लिहावं याचं तिला भान राहू नये.. इतकी कसली ही अगतिकता..?
मला राहून राहून या गोष्टीचे नवल वाटत होते.. काहीसा गोंधळलो होतो मी.. पण कश्यामुळे..? नेत्रा काही माझ्या अगदीच नात्यातली नव्हती.. की तिच्या असल्या वागण्याने मला काही फरक पडावा..
पण नाही.. तिने लिहिलेल्या मजकूरात मला काहीतरी वेगळे वाटत होते. असं वाटतं होतं की काहीतरी तिच्या इच्छेविरुद्ध होतेय.. तो मजकूरसुद्धा तिला लिहावासा वाटत नसावा.. एक गोष्ट स्पष्ट होती की तिच्या मनात जी काही कालवाकालव होत होती, ती बिचारी कुणाला सांगू शकत नव्हती. पण असं काय असावं, जे ती आपल्या आईवडिलांना सांगू शकत नव्हती.. वयाच्या या टप्प्यावर तिला काय सतावत असेल...
एक मिनिट.. वयाच्या या टप्प्यावर.. म्हणजे नेमकं काहीतरी प्रेमप्रकरण वगैरे असलं असू शकतं.. माझ्या डोक्यात लख्खपणे प्रकाश पडला आणि नेत्राच्या त्या मजकूरासंबंधी अंधुकशी दिशा मिळाली. काही झाले तरी माझ्या मुलीसारखी आहे ती...
उरलेले पेपर तपासून मी घराबाहेर पडलो. सायंकाळची वेळ होती, म्हणुन मी जवळच्याच एका शांत जागेत जाऊन विचार करू लागलो. खरं सांगतो, माझ्या डोक्यातून नेत्राचा विषय काही केल्या मिटत नव्हता. मला काहीतरी करायला हवे होते. विचार करता करता माझ्या अल्पमतीला पटले त्या दृष्टीने मी पावले टाकायचे ठरवले. काम जोखमीचे होते, परंतु मी सावधरीतीने ते पार पाडणार होतो. पुढचे काही दिवस मला नेत्रावर पाळत ठेवायची होती, ते देखील कुणाच्याही लक्षात येऊ न देता.. नेत्राच्या तर नाहीच नाही..
माझे घर तसे नेत्राच्या घरापासून दूर असले तरी तिच्या घराजवळच असलेल्या सार्वजनिक वाचनालयाबाहेर वेळ घालवणे मला शक्य होते. तिथून नेत्राचे घर माझ्या नजरेच्या पल्ल्यात राहीले असते शिवाय बाहेर जाण्याच्या रस्त्यावरच मी असल्याने नेत्रा कधी घरातून बाहेर पडलीच तर माझ्या नजरेतून ती सुटली नसती.
पाळत ठेवण्याचा तो पहिलाच दिवस आणि पहिलीच सायंकाळ होती आणि माझा तर्क अगदीच योग्य ठरला होता. सायंकाळी सातच्या सुमारास जेव्हा अंधुकसा प्रकाश आणखी धूसर होऊ लागला तेव्हा मी नेत्राला घराबाहेर पडताना पाहीले. माझ्या अगदी समोरून ती पुढे गेली पण तिने ढुंकूनसुद्धा माझ्याकडे पाहीले नाही. एकप्रकारे ते बरेच झाले म्हणा.. पण नाही.. काहीतरी चुकत होतं. नेत्राची नजर अगदी क्षणभरसुद्धा वर झालेली दिसली नाही. तिच्या चालीत विशिष्ट लयबद्धता वाटत होती. जसं एखाद्या खेळण्यातल्या बाहुलीला चावी दिल्यावर ती पुढे पुढे सरकत जाते अगदी तसं..
नेत्रा पुढे जाताच मी काही अंतर राखून तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तालुका जवळ असला तरी आमचा पट्टा गावाकडचा असल्याने इकडे सायंकाळी सात नंतरची वेळ म्हणजे दिवसभराची कामे उरकून आपापल्या घरी परतण्याची. वाटेत दिसणाऱ्या काही परिचितांची नजर चुकवत आणि पुढे जाणाऱ्या नेत्रावरची नजर ढळू न देता मी पुढे जात होतो. का कुणास ठाऊक पण मनात ना ना तर्हेच्या विचित्र कल्पना जन्म घेऊ पाहत होत्या. इतक्या उशीरा नेत्रा कुठे बरं निघाली असावी, हा प्रश्न मनात उठत होता.
माझ्या मनात चिंतेने तेव्हा प्रवेश केला जेव्हा मी पाहीले की गावाची वेस ओलांडून नेत्रा मुख्य रस्त्यापलीकडे जात होती. आत्ता.. या वेळेला..? पण ती वाट तर नदीकडे जात होती. नेत्राचं असं कोणतं काम तिकडे असावं..? तिने याबद्दल घरी सांगितलं तरी असावं की नाही..?
धावत माघारी जाऊन तिच्या आईवडिलांना बोलावण्याचा विचार माझ्या मनात एक क्षण आला. परंतु मग नेत्राचा इथे येण्यामागचा उद्देश मला कळला नसता. मी मनाचा हिय्या करून तिचा पाठलाग करण्यावर ठाम राहिलो.
एव्हाना अंधार बराच दाटून आला होता. रस्ता ओलांडून मी नदीकडे जाणाऱ्या पायवाटेवरून चालत होतो. चंद्राचा मंद पांढुरका प्रकाश भोवताली पसरला होता. त्याच्याच आधारे पायाखालची वाट चाचपडत मी कसाबसा नेत्राचा पाठलाग करत होतो. पायाखाली येणारी माती, बारीकसारिक दगड यांचे अडथळे पार करताना बारीकसाही आवाज न येण्याची दक्षता मी घेत होतो.
दूरपर्येंत उजाड, निर्मनुष्य आणि भकास वातावरणाची झलक दिसतं होती. क्वचित काही झाडं वगळता फक्त मोकळी शेतजमीन माझ्या आसपास होती. किटकांचा गोंगाटदेखील तिथल्या शांत परिसरावर काहीच असर दाखवू शकला नाही. सन्नाट्याचं इतकं अभद्र मळभ त्यावेळी तिथं साचलं होतं. नाही म्हणायला काहीशी भीती आता माझ्या मनात प्रवेश करू लागली होती. पायवाटेवरून जाताना मध्येच बाजूच्या झाडाची एखादी फांदी जरी हलली तरी दचकायला होत होतं.
हे नक्की आहे तरी काय..? नेत्राचं जरी काही प्रेमप्रकरण असेल तरी त्यासाठी इथवर येण्याची गरजच काय..? रात्री अपरात्री असं एकट्या मुलीने इथं येणं फार फार धोक्याचं. पण सध्या मला माझी स्वतःची काळजी जास्तच वाटत होती. कुणी अचानक माझ्यावर हल्ला केला तर.. माणसाचं ठीक आहे.. पण भुतं..? मी स्पष्ट सांगतो मला त्या गोष्टींचा अनुभव आहे.. म्हणुन यावेळी मनात भीतीसुद्धा आहे.
हे एवढेच क्षण.. माझं लक्ष सभोवतालच्या इतर गोष्टींत गुंतलं आणि फक्त तेवढ्याच वेळात नेत्रा दिसेनाशी झाली. मी संपूर्ण परिसरावर नजर फिरवली. अंधार असला तरी मानवी आकृती दिसण्याइतपत नजर सरावली होती. पण नाही.. नेत्रा समोर नव्हतीच.. ती अचानकपणे गायब झाली होती.
नवल वाटल्याने मी काहीसा धावतच पुढे जाऊ लागलो आणि वीस पावलांवर वाटेतल्या खाचखळग्यांचा अंदाज न आल्याने मी तोल जाऊन खाली कोलमत जाऊ लागलो. तो साधारण दोन अडीच फुटांचा उतार होता, ज्याच्यावरुन मी खाली घसरलो होतो. अंधारात तो मला नीट दिसला नव्हता पण माझ्या अश्या अचानकपणे धडपडण्याने तिथे जवळच सुरु असलेल्या कृतीत मात्र व्यत्यय आला होता. अतिशय गडबडीत तिथे हालचाल झालेली मी पाहीली.
समोरचं दृश्य पाहून प्रथम तर मला धक्काच बसला आणि दुसऱ्या क्षणाला मस्तकात चीड निर्माण झाली.
"नेत्रा...!" माझ्या ओठांचा चंबू उघडाच राहीला.
आपली अस्ताव्यस्त झालेली कापडे सावरत नेत्रा जागची उठली आणि काही न बोलता घराच्या दिशेने जाऊ लागली. मागे राहिलेल्या त्या तिशीतल्या इसमाकडे जळजळीत कटाक्ष टाकीत मी गेलो आणि जाब विचारू लागलो. मला वाटले, मला तिथं पाहून त्याला शरम वाटेल वा घाबरून तो माफी मागेल, परंतु असं काहीच घडलं नाही.
माझ्या रागीट नजरेला त्याने डोळे मोठे करून कठोर उत्तर दिले. मी कबूल करतो, मी मुलांवर धाक धाकवू शकतो. परंतु गुंडगिरी हा माझा पिंड नाही आणि समोरचा इसम मला पक्का मुरलेला वाटत होता. तरीही उसनं अवसान आणून मी त्याला डाफरत म्हणालो..
"शोभतं का हे तूला.. शाळेतली मुलगी आहे ती.. अरे जरा वयाचा तरी विचार करायचास.. शेवटचं सांगतोय तिच्यापासून लांब रहा.. नाहीतरी पुढच्यावेळी तिच्या आईवडिलांसोबत पोलीससुद्धा येतील..." मी माझा मास्तरकी खाक्या दाखवत त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला.
पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तरी मला असेच वाटले की माझा प्रयत्न फुकट गेला आहे..
"तू मध्ये नाक खुपसणारा कोण रे..? आणि हे तू नेत्राला समजावून बघ.. तूच काय तिच्या आईबापाला सांग तिला समजवायला.. बघ ती ऐकतेय का.. ती फक्त मी सांगेल तेच ऐकेल.. आणि हो.. तुझी धमकी तुझ्याकडेच ठेव.. पुन्हा जर तू आमच्या जवळ आलास तर तुझी हाडंच मोडून ठेवीन बघ.." मला धमकावून तो इसम विरुद्ध दिशेला म्हणजे नदीकडच्या बाजूने निघून गेला.
एक दोन क्षण मी सुन्न होऊन उभा होता. आता मी काय ऐकलं, त्याचाच विचार करत.. मध्येच नेत्रा आठवली तसे मी पुन्हा तिच्या घराच्या दिशेने धावू लागलो. कसंही करून तिला मध्येच गाठून समजावण्याचा माझा प्रयत्न होता. ती जे काही करतेय ते चुकीचं होतं, यातून तिच्या आयुष्याची वाताहत झालेली मला पाहवली नसती. ते ही या प्रकरणाची मला कल्पना असताना.
मी धावत पळत कसेबसे तिला वेशीजवळ गाठले आणि तिला हाक मारून थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ती आपल्याच तालात पुढे निघाली होती. शेवटी मागूनच तिचा हात पकडून मी सज्जड दम घातला.
"नेत्रा, जर तू ऐकणार नसशील तर मला नाईलाजाने तुझ्या आईवडिलांना सर्वकाही सांगावे लागेल.."
माझ्या त्या शब्दांचा योग्य परिणाम झाल्याचे जाणवले. नेत्रा एका जागी थांबली आणि नजर खाली ठेवतच तिने हाताकडे पाहीले. तिचा हात अजूनही माझ्या हातात होता. मी चटकन हात सोडला तसे तिची नजर हळूहळू वर होऊ लागली.
हा इतक्या वेळाचा पाठलाग, सभोवतालचा अंधार, जीवघेणी शांतता, दूरवर पसरलेल्या मोकळ्या शेतजमिनी हे सगळं त्या क्षणाला फिकं पडलं. आतापर्येंत यातलं कुणीही मला पूर्णपणे घाबरवू शकलं नव्हतं. पण हा एक क्षण.. जेव्हा नेत्राची ती हिरवी विषारी नजर माझ्या नजरेला भिडली.. तेव्हा मात्र मी गलीतगात्र होऊन गेल्यासारखा स्तब्धपणे एकाजागी उभा राहीलो.
नेत्राच्या त्या नजरेतली विशिष्ट चमक मला अस्वस्थ करत होती. गालावर पडलेल्या बारीकश्या खळीमुळे ओठ किंचितसे पसरले होते. ते मंद हास्य तिच्या चेहऱ्यावर जहरी भाव दर्शवु लागले होते. त्या क्षणात मी सारं सारं काही विसरू लागलो होतो.. की कुणीतरी जबरीने माझ्या मेंदूचा ताबा घेऊन मला सगळं विसरण्यासाठी भाग पाडत होतं. मी तंद्रीतून बाहेर येत दोन पावलं मागे सरकलो. नेत्राच्या डोळ्यांवरून माझी नजर हटवत मी दुसरीकडे पाहू लागलो.
एक प्रकारची जीवघेणी शांतता त्यावेळी मनावर दडपण आणत होती. कुणी काहीच बोलत नव्हते. मी नेत्राकडे सरळ पाहणे टाळत होतो परंतु नजरेच्या कोनातून तिचे वर्तन न्याहाळण्याचे माझे कार्य सुरु होते. असं वाटतं होतं की, ती सुद्धा मला आपादमस्तक न्याहाळत होती. तिच्या विषारी नजरेतून काळ्या वायुचे तीर माझ्यावर बरसावत होती. माझ्या शरीरावर ते असंख्य वार मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. असं वाटतं होतं की माझ्या अंगातले रोम रोम आपली जागा सोडून नेत्राचे तीर अलगद झेलत होते आणि माझ्या मर्जीविना त्या काळ्या वायुला शरीरात विसावू देत होते.
"यावेळी फक्त ताकीद दिलीय.. पुन्हा माझ्या नादाला लागायचं नाही.." नेत्राचे तुटक शब्द माझ्या कानावर पडले आणि तिची अस्पष्ट आकृती मला दूर जाताना दिसली. ती गेली हे एकप्रकारे चांगलेच झाले पण जाताना तिने तो झटका मला दिला तो माझ्या चांगलाच लक्षात राहीला.
काही क्षणातच मला माझे अंग गरम भासू लागले होते. दुसरीकडे हुडहुडीसुद्धा वाटत होती. एकाएकी माझा शरीरावरचा ताबा सुटू लागला होता. अंधारात बुडालेल्या त्या निर्जन रस्त्याच्या बरोबर मध्यावर मला भोवळ येऊ लागली होती. हे काय घडतेय मला काहीच कळत नव्हते. अंगभर नुसता कंप सुटला होता. त्या परिस्थितीत फक्त एकच विचार डोक्यात होता.. हा प्रकार सामान्य नव्हता. नेत्रासारखी मुलगी असं काही करणं शक्यच नव्हतं. हे नक्कीच काहीतरी अमानवी होतं... आणि माझ्या नजरेत एकच व्यक्ती हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळू शकली असती.. हातापायांतले त्राण नाहीसे झाल्यासारखा मी खाली कोसळलो पण त्या क्षणीसुद्धा माझ्या मुखात ते नाव आलेच..
सुदर्शन...!
क्रमशः
निलेश देसाई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: