नेत्रा काणेकर भाग दोन : सुदर्शन कथा
आतापर्येंत आपण ऐकलेत की, नेत्राचा पाठलाग करता करता गावाची वेस ओलांडून नदीच्या दिशेने पुढे गेलेले मास्तर एका वेगळ्याच चक्रव्युव्हात फसले गेले आणि नेत्राशी भेट घडल्यावर तिच्या विषारी नजरेतील काळा वायू मास्तरांच्या शरीरात पसरला गेला. त्या सौम्य विषाच्या अमलाखाली मास्तर बेशुद्ध होऊन रस्त्यावरच कोसळले..
आता पुढे..
मला जाग आली तेव्हा पहाट झाली होती. सुरुवातीला काहीसं अस्पष्ट, अंधुक दिसत होतं. परंतु माझ्या आसपासच्या वातावरणात प्रसन्नता होती. सावरून डोळे चोळत मी उठलो आणि पाहतो तर मी माझ्याच घरी झोपलो होतो. समोरच्या खुर्चीवर कुणीतरी पाठमोरं बसलं होतं. कोण असावं ते.. मला फारसा विचार करण्याची आवश्यकताच भासली नाही.
"सुदर्शन..!" मी अक्षरशः धडपडत उठण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणाला माझ्या शरीरातली कमजोरी मला जाणवली.
"मास्तर... मी आहे इथेच.. उठण्याची तसदी घेऊ नकोस.. तू अजूनही शक्तिहीन आहेस.." सुदर्शन लगबगीने माझ्याजवळ येत म्हणाला.
सुदर्शनला समोर पाहून माझ्या मनाला खरोखरच उभारी मिळाली होती. म्हणूनच तर मी शारीरिक वेदना साफ विसरून गेलो होतो आणि या वेदना देणाऱ्या व्यक्तीबद्दलसुद्धा.
नेत्रा... माझ्या नजरेसमोर काल रात्रीचा प्रसंग तरळून गेला. काय होतं ते.. नेत्रा अशी विचित्र कशी वागू शकली..?
"मास्तर, सध्या आराम कर. काय झालं, यावर आपण नंतर चर्चा करू.." माझ्या गंभीर चेहऱ्याकडे पाहत सुदर्शन म्हणाला.
मी मान हलवत त्याला प्रतिसाद दिला परंतु मनातल्या उत्सुकतेने मला तो प्रश्न विचारण्यास भाग पाडले.
"पण सुदर्शन.. तू इथे कसा..? आणि मी तूला कुठे सापडलो.." मी विचारले.
माझ्या प्रश्नावर गंभीर उसासा टाकत सुदर्शन बोलू लागला..
"काही नाही, सहज कामासाठी रात्री गावाकडे आलो होतो.. तेव्हा तू रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडलास.." बोलता बोलता माझ्यापासून नजर फिरवीत सुदर्शन खिडकीजवळ गेला आणि बाहेर पाहू लागला.
खरंतर त्याचं उत्तर मला पटलं नव्हतं पण मी जाणून होतो यामागे सुद्धा काहीतरी ठोस कारण असावं. असो, मी सुदर्शनवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकत होतो. त्यामुळे मी त्याला प्रतिप्रश्न केला नाही.
काही वेळात मला थोडं बरं वाटू लागलं तसे आम्ही दोघे मुख्य विषयाकडे आलो. इथे एक गोष्ट मी नमूद करतो, सुदर्शनने कसलीतरी कापडी पट्टी माझ्या कपाळावर लावून ठेवली होती, जिच्या प्रभावामुळेच माझ्या शरीरातील वेदना लवकरात लवकर नाहीश्या झाल्या होत्या.
"ह्म.. बोल मास्तर, असं काय घडलं होतं..?" सुदर्शनने माझ्या डोळ्यांत रोखून पाहत विचारले.
मी एक दीर्घ श्वास घेतला आणि सुरुवातीपासूनचा सगळा वृत्तांत सुदर्शनला सांगितला.
"नेत्राच्या डोळ्यांत काहीतरी होते.. काळपट असं.. काहीतरी माझ्या शरीरात शिरण्याचा प्रयत्न करत होतं किंवा शिरलंदेखील असेल.. कल्पना नाही.. कारण मला सहस्त्र इंगळ्या एकत्र येऊन डसत असल्यासारखे वाटत होते. त्या प्रकाराने माझी शुद्ध हरपत होती. मला वाटतं, नेत्रावर कसल्यातरी संमोहनाचा प्रभाव होता. कुठल्यातरी मोहिनीखाली ती असावी.." मी तर्क मांडला.
"नाही मास्तर.. हा मोहिनीचा प्रकार वाटत नाही.. हे काहीतरी निराळेच प्रकरण आहे. संमोहनाखाली व्यक्ती विचित्र वागू शकते, पण असं फक्त डोळ्यांनीच कुणाला इजा पोहचवू शकत नाही. तू सांगतोयस त्याप्रमाणे जरी नेत्रा खरंच एखाद्या जाळ्यात अडकली असली तरी मग तिच्यामध्ये इतकी शक्ती कुठून आली, हे पहिले आपल्याला शोधून काढावे लागेल.." सुदर्शन गंभीर होत म्हणाला.
"मग निघायचं का नेत्राच्या घरी..?" मी लगबगीने उठत सुदर्शनला विचारले.
यावर सुदर्शनचा चेहरा पाहण्यायोग्य होता. चेहऱ्यावर मंद हसू आणत तो म्हणाला,
"मास्तर.. काल रात्रीचं विसरलास का..? तूला तिथं पाहताक्षणी ती चिडून उठेल आणि मला पाहून सावध होईल. लक्षात ठेव, ती नेत्राच आहे यावर माझा जरादेखील विश्वास नाही. मला शंका आहे की नेत्राच्या रूपात तिथं भलतंच कुणी वावरत असावं.."
"काय..? सुदर्शनच्या त्या खुलाश्यावर मी आ वासून त्याच्याकडे पाहत राहीलो.
"पण मग तिने तो मजकूर कसा लिहून ठेवला.. आणि इतक्यात तिच्या आईवडिलांनासुद्धा कळले असते की..?" मी मनातली शंका विचारली.
"तसं नाही मास्तर.. मी फक्त तर्क लावतोय.. आणि खरंच तसं काही असेल तर जेव्हा कधी गरज वाटेल तेव्हाच ती आपलं खरं रूप सर्वांना दाखवेल आणि ते नेत्रासाठी धोक्याचं असेल.. असो, या सगळ्या हवेतल्या बाबी आहेत. आपली तपासाची दिशा काहीशी वेगळी आहे. तू म्हणालास त्याप्रमाणे तो इसम रात्री नदीकडच्या वाटेने निघून गेला, बरोबर ना..?" सुदर्शनने विचारले.
"हो.. भलताच निडर असावा.. इतक्या रात्री नदीकडे..?" मी म्हणालो.
"हो.. प्रथम तेच जाणून घेऊ.. इतक्या रात्री तो नदीच्या दिशेला का गेला.. काय असावं असं तिकडे.." सुदर्शन गुढपणे पाहत विचार करू लागला.
मी सुद्धा एकदोन क्षण विचारांत हरवलो. मेंदूवर जरासा ताण देताच काहीतरी आठवले.
"माझ्या माहितीप्रमाणे तिकडे नदीच्या जवळच स्मशानभूमी आहे.. मी कधी गेलो नाही तिकडे.. पण ऐकून आहे.." मी उत्तरादाखल म्हणालो.
यावर सुदर्शनने माझ्यावर एक कटाक्ष टाकला. त्याच्या नजरेत मला विशेष चमक जाणवली. जणू काहीतरी उमगल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर आला होता. त्याने एक उसासा सोडला आणि म्हणाला..
"मास्तर.. तयार रहा.. आज रात्री नदीवर.. नेत्राला कळू न देता जर काही करायचे असेल, तर इथेच एक अंधुकशी आशा आहे.. कदाचित तो इसम सापडेल किंवा नेत्रासोबत घडत असलेल्या प्रकाराबाबत काहीतरी सुगावा मिळेल.. तत्पूर्वी मी आतल्या खोलीत तयारी करतो.."
असे म्हणत सुदर्शन आत गेला. ही त्याची ध्यानाची वेळ होती. त्याच्या पाठमोऱ्या आकृतिकडे पाहत मी अर्धवट मान हलवून होकार कळविला आणि सायंकाळच्या दौऱ्यासंबधी विचार करू लागलो.
संध्याकाळी सूर्य अस्ताला जाईपर्येंत आम्ही वाट पाहीली आणि अंधाराची काळी छाया पसरताच आम्ही दोघेही घराबाहेर पडलो. यामागे कारण इतकेच होते की आम्हाला नदीकडे जाताना कुणी पाहू नये. गावाची वेस ओलांडेपर्येंत आम्ही मंद गतीने चालत होतो. परंतु मुख्य रस्ता पार करताच आमच्या पावलांनी वेग घेतला.
आकाशात चंद्राची बारीकशी कोर दिसत होती. परंतु चांदण्यांचा प्रकाश झाकोळला होता. मी आज येताना सोबत टॉर्च घेतला होता. ज्याच्याआधारे पायाखालची जमीन नजरेस पडत होती. सुदर्शन आणि मी काही न बोलता वाट तुडवत होतो. माझ्या मनात आजदेखील कालसारखे विचार तरळत होते. ही मोकळी शेतजमीन, वातावरणातला सन्नाटा, झाडांमधली सळसळ, अंगावर बोचणारा थंड वारा सगळं सगळं कालसारखंच होतं.. पण आज मला कसलीही भीती वाटत नव्हती.
त्यामागचं कारण.. माझ्या पुढे शांतपणे चालत होतं.. अर्थातच सुदर्शन..
चालता चालता आम्ही त्या जागेच्या जवळ येऊन पोहोचलो जिथे मी काल नेत्रा आणि त्या इसमाला पाहीले होते. मी लांबूनच सुदर्शनला खूण करून ती जागा दाखवली. सुदर्शन एक क्षण थांबला आणि आसपास कानोसा घेऊन तिथं कुणी नसल्याची खात्री करू लागला. आम्ही दबक्या पावलांनी पुढे सरकत होतो. जेव्हा तिथे कुणीही नसल्याची खात्री पटली तेव्हा मात्र आम्ही पुन्हा आमचा वेग पकडला आणि नदीच्या दिशेने झपाट्याने जाऊ लागलो.
जवळपास वीस मिनिटे चालल्यावर आमच्या पायाखालची माती कमी होऊन पायवाटेवर बारीकमोठे गुळगुळीत दगड आम्हाला जाणवू लागले. नदी जवळ आल्याची ती खूण होती. समोर नदीचा वाहता प्रवाह होता. पाणी पुढे सरकत असल्याचा हलकासा आवाज कानी पडत होता. आसपास हवेच्या थंड लहरी आता आणखीनच उसळ्या खाऊ लागल्या होत्या. तिथला सौम्य पण कर्णवेधक नाद मन धुंद करून टाकणारा होता.
एका ठिकाणी सुदर्शन थांबला आणि मागे वळून माझ्याकडे पाहू लागला. पुढे पायवाट संपली होती. मी टॉर्चचा प्रकाश आसपास फिरवला. काही काटेरी झुडपे एकमेकांपासून अंतर ठेऊन उभी दिसली. मी टॉर्चचा झोत आणखी दूर केला आणि दूरवर आम्हाला स्मशानाचा ढाचा दिसला.
दुरून त्याच्या भग्नावस्थेची कल्पना मी मनातल्या मनात करू लागलो. टॉर्चच्या प्रकाशात तो एखाद्या ओसाड, उजाड दगडी सांगड्यासारखा भासत होता. एक शब्दही न बोलता आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला. सुदर्शन आणि माझ्यातला तो अलिखित करार होता. अश्या कार्याच्या वेळी आम्ही एकमेकांशी बोलणं टाळत असू. एकतर काही महत्वाचे असेल तर तो मला अगोदरच सांगायचा आणि दुसरं म्हणजे त्याच्या विचारचक्रात खंड टाकायला मला अजिबात आवडायचे नाही.
पाचेक मिनिटांत आम्ही स्मशानाच्या त्या दगडी सांगड्याजवळ येऊन पोहोचलो होतो. अपेक्षेप्रमाणे तो फारच भकास आणि उदासवाना वाटत होता. मृत्यूनंतर विसाव्याचे ठिकाण.. न जाणो कित्येक माणसांची राख झालेली त्याने पाहीली असेल. नैराश्याची झलक जर या स्मशानरूपी सांगड्यातून दिसत असावी तर त्यात नवल ते काय..?
मूळ प्रश्नापासून संपूर्णपणे फारकत घेत मी आपल्याच विचारांत हरवून गेलो होतो. इतका की आमचा तिथे येण्याचा उद्देशसुद्धा मी काहीक्षण विसरून गेलो होतो. तितक्यात माझ्या कानावर सुदर्शनची दबक्या आवाजातली हाक ऐकू आली.
"मास्तर.."
मी आवाजच्या दिशेने पाहीले. सुदर्शन माझ्यापासून बराच पुढे निघून गेला होता. अगदी स्मशानापलीकडे असलेल्या झाडीजवळ मला तो उभा दिसला. मी घाईतच त्याच्याकडे जाऊ लागलो. टॉर्चचा प्रकाश मी त्याच्यावर टाकला होता परंतु त्याने तिथूनच काही न बोलता तोंडावर बोट ठेवत इशारा केला आणि टॉर्चसुद्धा बंद करण्यास सांगितले. मी अगदी हलक्या पावलांनी त्याच्याजवळ जाऊन पोहचलो. त्याला काय दिसले होते कुणास ठाऊक परंतु त्याने मला आवाज न करता मागेमागे येण्यास सांगितले आणि तो सरळ त्या गर्द झाडीत शिरला.
एकक्षण मी बावचळलो. इतक्या अंधारात त्या झाडीत शिरायचे म्हणजे काही साधी बाब नव्हती. एखादं लांबसडक जनावर मध्येच आडवं आलं तर.. पण धाडस करून मी सुदर्शनच्या मागोमाग आत शिरलो. सुदर्शन अगदी बारीकसारीक आवाजाचा कानोसा घेत आत जात होता आणि पाठोपाठ मी. पायाखाली झुडपाच्या बारीक फांदया, पानं तुडविताना शक्य तितका आवाज दडपण्याचा प्रयत्न करत होतो. फक्त दहा बारा फुटामध्ये ती झाडी पसरली होती पण मनातल्या दडपणाने घाम काढला अक्षरशः..
परंतु जशी झाडी संपली तसे समोर पाहतो तर मोकळ्या केलेल्या जागेवर एक कच्ची झोपडी दिसली. झोपडी तरी का म्हणावं तिला.. फक्त चार बांबू जमिनीत रोवून झाडाच्या फांदया, पाने यांनी झाकल्यासारखं केलं होतं नुसतं. सुदर्शन पुढे गेला आणि निरीक्षण करू लागला. मी त्याच्यापर्येंत पोहचलो तोच त्याने टॉर्च सुरु करण्यास सांगितले. मी ताबडतोब टॉर्च सुरु केला आणि आणि आम्ही तो परिसर न्याहाळू लागलो.
जेव्हा आसपास सगळीकडे नजर फिरवली तेव्हा माझ्या ध्यानात आले.. की झाडी तर संपलीच नव्हती. ती अजून बरीच पुढपर्येंत पसरली होती. इथे म्हणजे आम्ही उभे होतो फक्त तिथला काही परिसर मोकळा करून ती झोपडी उभारली होती. पण कुणी..? आणि कश्यासाठी..? गावापासून इतक्या लांब आणि ते ही स्मशानाजवळ कशाला कुणी हे उपद्याप करील. मी सुदर्शनकडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले. त्याने माझ्याकडे पाहत गप्प राहण्यास सांगितले.
त्या निर्जन स्थळी अजूनतरी आम्हाला तिथे कुणीही दिसले नव्हते. समोर फक्त ती झोपडी होती आणि मनातल्या प्रश्नांची उत्तरे फक्त आतील व्यक्तीच देऊ शकली असती.. जर त्या झोपडीत आत कुणी असेल तर..
त्या झोपडीचा अंदाज घेत सुदर्शन आत गेला. मी देखील त्याच्या पाठोपाठ झोपडीत आलो. टॉर्चच्या प्रकाशात झोपडीतल्या एकेका विचित्र वस्तूचे निरीक्षण करताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला होता. कुठे मानवी कवट्या, कुठे लांबसडक पायाचे हाड, कुठे सांध्यापासून वेगळा केलेला मानवी हात.. बाप रे.. आयुष्यात पहिल्यांदा मी असलं काही भयानक पाहत होतो. त्या मानवी अवशेषरुपी काटक्या पाहताना माझ्या मेंदूची नस फडफडू लागली होती. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला होता.
सुदर्शनदेखील गंभीर होऊन उजेडात येणाऱ्या एकेका गोष्टीचे निरीक्षण करत होता. पुढे सरकत सरकत शेवटी टॉर्चचा प्रकाश एका बाजूच्या कोपऱ्यावर पडला आणि मला शेवटचा धक्का बसला. समोरून नजर हटवीत मी मटकन खालीच बसलो. माझी ती अवस्था पाहून सुदर्शनने मला आधार दिला आणि टॉर्च आपल्या हातात घेऊन तो त्या कोपऱ्याच्या दिशेने पुढे गेला.
त्याचा धीटपणा पाहुन मला शरमल्यासारखे झाले. नाईलाजाने मी देखील त्याच्या मागे जाऊन उभा राहीलो.
आमच्या समोर त्या कोपऱ्यात एका मोठ्या दगडावर कुणीतरी बसले होते. डोळे बंद करून पिवळ्या रंगाच्या कपड्यांतली ती स्त्री एका बांबूच्या आधारावर डोके टेकून होती. पांढऱ्या फिक्या पडलेल्या तिच्या चेहऱ्यावर गडद बारीक व्रण उठून दिसत होते. मिटलेल्या डोळ्यांच्या खाली दाट काळी वर्तुळे जमली होती. मोकळे सोडलेले केस वाऱ्याच्या लहरीसोबत नाजूक हेलकावे खात होते. शरीरातल्या रक्ताचा थेंब अन थेंब सुकल्यासारखे संपूर्ण अंग पांढरे पडले होते. तिच्या कपाळावर कसलेसे काळे भस्म ओढले होते. एखाद्या वेगळ्याच विश्वात हरवल्यासारखी ती बांबूला डोके टेकवून स्तब्ध बसली होती. तिला पाहताच भीतीची थंड लहर माझ्या सर्वांगातून उठत होती. ही स्त्री मनुष्ययोनीतली असावी का..? असा प्रश्न एकक्षण माझ्या मनात आला.
आणि पाठोपाठ सुदर्शनचे उत्तरदेखील आले..
"नाही.. ही जिवंत नाही... हे एक प्रेत आहे.."
क्रमश:
निलेश देसाई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: