नेत्रा काणेकर भाग तीन : सुदर्शन कथा
आतापर्येंत आपण ऐकलेत की, स्मशानाच्या दिशेने गेलेल्या सुदर्शन आणि मास्तरांना तिथे पसरलेल्या झाडीत ऐका गुप्त आणि गूढ झोपडीचे दर्शन झाले. झोपडीत पसरलेल्या मानवी अवशेषासोबत एका कोपऱ्यात बसवून ठेवलेल्या प्रेताने मास्तरांचे मन विचलित झाले. प्रश्न हा होता की त्या झोपडीत कोण राहत असावं..? आणि तिथे अश्याप्रकारे मानवी सांगाडे आणि प्रेत ठेवण्यामागे नक्की काय कारण असावं..?
आता पुढे...
माघारी परतताना माझे हातपाय थरथरत होते. रात्रीचा थंड वारा माझ्यावर हावी होऊ पाहत होता. त्या झोपडीत पाहिलेल्या प्रेताचा चेहरा काही केल्या डोळ्यांसमोरून हटत नव्हता. तिथून निघताना सुदर्शनने मला बऱ्यापैकी धीर दिला होता. त्याचीच सोबत होती म्हणुन माझी मती अजून तरी ताळ्यावर होती. तरी बरे आम्ही फारकाळ तिथे थांबलो नव्हतो. झोपडीतल्या सर्व गोष्टींचे पुरेसे निरीक्षण केल्यावर सुदर्शन तात्काळ तिथून निघाला होता.
थकलेल्या शरीरामुळे अन काहीश्या भेदरलेल्या मानसिक अवस्थेमुळे त्या मिट्ट अंधारात परतीची वाट मला फार मोठी वाटत होती. काळोखात कित्येकदा पाय ठेचकाळत होते. परंतु तिकडे साफ दुर्लक्ष करीत मी जड झालेली पावले उचलत होतो. सध्या मला कसेही करून लवकरात लवकर घरी पोहोचायचे होते.
गावाची वेस ओलांडून आम्ही गावात पाय ठेवला तेव्हा मुख्य रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात सुदर्शनने माझ्या चेहऱ्याकडे पाहीले. त्याच्याशी नजरानजर होताच मी उगाचच इतरत्र पाहू लागलो. मग मात्र इतक्या वेळाची शांतता भंग करत सुदर्शन म्हणाला..
"मास्तर.. उगाच मनात अपराधीपणाचा भाव ठेऊ नकोस. तुझ्याजागी इतर कुणीही असते तरी त्याची तशीच प्रतिक्रिया असती. उलट मला अभिमान आहे की तू माझ्यासोबत तिथे येण्याचे धाडस दाखवलेस..."
सुदर्शनच्या त्या शब्दांनी मला थोडा धीर आला.
"पण सुदर्शन.. मी खरंच आतून खुप घाबरलो होतो.. असलं काही मी बापजन्मात पाहीलं नाही.." मी चाचपडत म्हणालो.
यावर सुदर्शनने चेहरा कठोर करत माझ्याकडे पाहीले,
"बरोबर आहे मास्तर.. हे प्रकरण फार फार गंभीर आहे.. आणि पुढे यापेक्षा आणखी भयानक गोष्टी समोर येणार आहेत.. जरी या प्रकरणात नेत्रा मध्यभागी असली तरी हे फक्त नेत्रापूरतं मर्यादित नाही.. यांत माझा सामना दोन किंवा त्याहून अधिक शत्रुंशी असणार आहे.. आणि साहजिकच ते सामान्य नाहीत, त्यामुळे यापुढे हे प्रकरण मी एकटयानेच हाताळीन.." सुदर्शन शांतपणे म्हणाला.
पण मला ते रुचले नाही.
"नाही सुदर्शन.. हा सामना फक्त तुझा नाही.. आपला आहे.. या प्रकरणात तू माझ्यामुळेच गुंतला आहेस.. यापुढे कसलीही परिस्थिती येऊ दे.. मी डगमगणार नाही.. शत्रू कितीही असू देत पण मी तुझी सोबत सोडणार नाही.." मी उत्तेजित होऊन माझा निर्धार सांगितला.
माझे उद्गार ऐकून सुदर्शन मनापासून हसला आणि माझ्या खांदयावर हात ठेवत बोलू लागला..
"मग ऐक मास्तर.. कधीही कितीही भीती वाटली तरी मी सोबत आहे हे विसरू नकोस. तुझ्या जीवाला धोका उत्पन्न होईल, अशी वेळ मी येऊ देणार नाही.."
सुदर्शनच्या शब्दांनी जणू अंगात हत्तीचे बळ आल्यासारखे वाटले. मनावरचा मघाचा ताण कुठल्याकुठे पळून गेला. आता मी पूर्णपणे निर्धास्त होतो.
घरी पोहोचेपर्येंत आमच्यात स्मशानभूमी, झोपडी आणि ते प्रेत याच विषयावर चर्चा झाली. काही गंभीर बाबींचा उलगडा होऊ लागला. आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टींबद्दल सुदर्शनने मला बरीच माहीती सांगितली. जसं की आजच प्रकरण..
आजच्या प्रकरणाबाबत सुदर्शनने जो काही खुलासा केला वा त्याच्या आकलनाप्रमाणे त्याने जे काही तर्क मांडले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो,
आम्ही भेट दिलेली ती गूढ झोपडी नक्कीच एखाद्या अघोरी व्यक्तीची होती. अघोरी.. जे जाळलेल्या मृतदेहाची राख सर्वांगाला फासतात. वेळ पडली तर शरीरधर्म म्हणुन मेलेल्या माणसाचे मांससुद्धा चवीने खातात. यासाठीच सहसा त्यांचे निवासस्थान अश्याच एखाद्या स्मशानाशेजारी असते. अघोरी लोक आपला बराचसा वेळ कसल्याश्या कठोर साधनेत व्यतीत करतात. प्रत्येकाची साधना करण्याची पद्धत आणि दैवत भिन्न असू शकते. काहींची दैवतं उग्र आणि कडक असतात. ज्यांना प्रसन्न करण्यासाठी साधकाला तितकीच कठोर तपश्चर्या करावी लागते. अश्या अघोरी व्यक्तीला साधनेचं फळ म्हणुन बऱ्याच सिद्धी प्राप्त झालेल्या असतात.
सुदर्शनच्या म्हणण्यानुसार ती झोपडी अश्याच एखाद्या अघोरी माणसाची असावी. तिथे जमा केलेले मानवी अवशेष तरी हेच दर्शवित होते. कोपऱ्यातले स्त्री जातीचे प्रेत ज्याप्रकारे बसवण्यात आले होते, त्यावरून हा निष्कर्ष काढता येतं होता की सध्या त्या प्रेताचा मूळ आत्मा अघोरी व्यक्तीच्या आदेशानुसार कुठेतरी कार्य करीत असावा. सुदैवाने आम्ही तिथे गेलो तेव्हा आमच्या शोधकार्यात अडथळा आणणारे कुणी भेटले नव्हते.
सुदर्शन आणखीही बरेच काही सांगत होता. नेत्रासोबत मला दिसलेला इसम नदीच्या दिशेने आला म्हणजेच तो या अघोरी व्यक्तीला भेटण्यासाठीच आला असावा. त्याच्याच साहाय्याने नेत्रावर कसलासा पाश घालण्यात आला होता. पण असं कुणासोबतही काहीही करता येऊ शकतं..?
"सुदर्शन.. पण नेत्रावर असा पाश कसा काय घालता येऊ शकतो..? माझ्या माहितीप्रमाणे ती कधी कुणाच्या अध्यातमध्यात नसायची. शाळेतली खूपच हुशार आणि शांत मुलगी आहे ती.." मी माझी शंका विचारली.
"हम्म.. मास्तर त्याचंच उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला उद्या नेत्राच्या घरी जावे लागेल.. पाहू तिथून काही माहीती हाती लागते का ते.." सुदर्शन थंडपणे म्हणाला.
नेत्राची भेट म्हणजे माझ्या डोक्यात कालची रात्र आली. एकक्षण माझे सर्वांग शहारून उठले.
"पण सुदर्शन, तूच तर म्हणाला होतास की सध्या नेत्राकडे जाणं धोक्याचं आहे म्हणून.." मी विचारले.
"हो मास्तर.. पण मी हे देखील म्हणालो आहे की तुझ्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाही.." सुदर्शन हसत म्हणाला.
"बघ.. आत्तापुरते तिच्या घरी भेट देण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही.. मला खात्री आहे आपल्या पुढील प्रश्नाचे उत्तर तिथेच मिळेल. आपल्याला तिच्या घरी जायचे आहे पण खबरदारी घेऊन.. आणि ते सुद्धा नेत्राच्या बाबांसोबत. त्यांच्या घरी तू मास्तर म्हणुन जाशील आणि मी तिच्या बाबांचा मित्र म्हणून.." असं म्हणत सुदर्शनने मला संपूर्ण योजना समजावून सांगितली.
त्याची योजना अगदीच लाजवाब होती. माझ्यापूरतं सांगायचं तर नेत्राला सामोरे जाण्याविषयी मनात धाकधूक होतीच परंतु सुदर्शनने आश्वस्थ केल्यामुळे मी काहीसा निर्धास्त होतो.
दुसरा दिवस उजाडला तो एक नवे आव्हान घेऊन. काल रात्री जी काही चर्चा आमच्यात घडली ते फक्त अंदाजाचे ठोकताळे होते. परंतु आता प्रत्यक्ष नेत्राची भेट घेऊन आम्हाला ते तर्क पक्के करायचे होते. सुदर्शन आज सकाळपासूनच आतल्या खोलीत ध्यानाला बसला होता. मी घराबाहेर पडून नेत्राच्या बाबांना त्यांच्या नेहमीच्या वाटेत गाठले आणि निरोप कळविला. दुपारचे जेवण उरकून आम्ही निवांत बसलो होतो आणि नेमके नेत्राचे बाबा गणपतराव माझ्या दाराबाहेर येऊन उभे राहीले.
माझ्या एका शब्दावर गणपतराव आज अर्ध्या दिवस सुट्टी घेऊन आले होते. त्यांना आत बोलावून मी सुदर्शनशी परिचय करून दिला. सुरुवातीला सुरु झालेल्या इतर गप्पा जश्या रंगात येऊ लागल्या तसे सुदर्शनने मला खूण केली. मी जवळच ठेवलेली नेत्राची सहामाही परीक्षेची उत्तरपत्रिका गणपतरावांच्या हाती दिली आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो.
उत्तरपत्रिकेवरचा तो मजकूर वाचून गणपतराव लालबुंद झाले. पण ते काही बोलणार या अगोदरच योग्य वेळ ओळखून सुदर्शन बोलू लागला..
काल रात्री आम्ही घेतलेला तो विशेष अनुभव सुदर्शनने कथन केला. त्यानंतर मग मी अगोदरच्या रात्रीचा प्रसंग विश्लेषण करून सांगितला. सुदर्शन आणि मी दोघांनी घटनांचे क्रम जाणूनबुजून बदलले होते. सत्य परिस्थिती गणपतरावांच्या पचनी पडणे आवश्यक होते. नाहीतर त्यांचा उगाचच गैरसमज झाला असता. सामान्य माणसाला अश्या बाबी पटकन रुचत नाहीत.
आमची सांगण्याची योग्य पद्धत असो वा सुदर्शनची एखादी गोष्ट समजावण्याची कला, सुरुवातीला हे सगळं नाकारणारे गणपतराव हळूहळू आमच्या म्हणण्यास सहमती दर्शवू लागले. जेव्हा सुदर्शनचा परिचय मी आणखी विस्ताराने केला तेव्हा तर गणपतराव अगदीच नरमले आणि सुदर्शनजवळ नेत्राला वाचवण्याची विनंती करू लागले.
"गणपतराव.. अहो असं धीर सोडून नाही चालणार.. आपण आपले प्रयत्न करायचे.. बाकी सगळं ईश्वराच्या हवाली.. तो सगळं काही ठीक करेल.. चला आता आपल्याला निघायला हवं.." सुदर्शन धीर देत म्हणाला.
पुढे करावयाच्या कृतींवर पुन्हा एकदा चर्चामसलत झाली आणि दुपार टळण्याच्या सुमारास आम्ही तिघेही नेत्राच्या घराकडे रवाना झालो.
गणपतराव सोबत असल्यामुळे नेत्राच्या घरी पोहचून तिच्या आईसोबत औपचारिक संभाषण सुरु करण्यात काहीच अडचण आली नाही. सुदर्शनने इकडच्या तिकडच्या गप्पांपासून सुरुवात करत नेत्रासंबंधी प्रश्न विचारले. गणपतरावांनी आपल्या पत्नीला वरवर कल्पना दिली. सुदैवाने नेत्रा तेव्हा तिच्या खोलीत होती. त्यामुळे आमच्या संभाषणात व्यत्यय आला नाही.
"हल्लीच्या काही दिवसांत घरातली किंवा नेत्राची एखादी वस्तू हरवली वा सापडत नाही अथवा चोरीला गेली, असं काही झाले का..?" सुदर्शनने विचारले.
यावर बराचवेळ विचार करत असलेली नेत्राची आई काहीतरी आठवून म्हणाली,
"हो.. काही दिवसांपूर्वी बाहेर सुकत ठेवलेले नेत्राचे कपडे बहुधा वाऱ्याने उडून गेले. आम्ही आसपास जाऊन पाहीले पण ते पुन्हा सापडलेच नाहीत.."
नेत्राच्या आईचे ते उद्गार ऐकून माझे कान टवकारले गेले. कदाचित आम्हाला हव्या असलेल्या प्रश्नाचे उत्तर आता मिळणार होते.
"पिवळ्या रंगाचे होते का ते कपडे..?" सुदर्शनचा पुढचा प्रश्न तयारच होता.
यावर आश्चर्य व्यक्त करत नेत्राच्या आईने प्रतिप्रश्न केला..
"काय..? तुम्हाला कसे माहीत..?"
गणपतराव देखील आशेने सुदर्शनकडे पाहू लागले.
सुदर्शनची नजर मात्र सगळ्यांपासून हटत कुठेतरी दूर जाऊन स्थिरावली होती. तो काहीच म्हणाला नाही. पण मला आठवले, काल रात्री आम्ही पाहिलेल्या प्रेताच्या शरीरावरसुद्धा पिवळे कपडे होते.. म्हणजे..? खरंच हा संदर्भ जोडल्यास हे कितपत भयानक असेल..? त्या नुसत्या विचारानेच माझ्या अंगावर काटा आला.
तितक्यात आतल्या खोलीतून नेत्रा बाहेर आली आणि अपेक्षेप्रमाणे मला तिथे पाहताच तिचा पारा चढला. सुदर्शनवर तिची नजर पडताच ती पुन्हा शांत झाली. पण तिच्या चेहऱ्यावरच्या बदललेल्या खुणा मी टिपल्या होत्या. बाहेरच्या सोफ्यावर ठेवलेली ओढणी उचलत ती पुन्हा आत जाऊ लागली. जाताना मात्र तिने माझ्याकडे पुन्हा एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि सर्वांसमोर साळसुदपणे म्हणाली,
"मास्तर, अभ्यासाबद्दल जरा शंका आहे, मला समजावता का..?"
काय उत्तर द्यावे के क्षणभर मला कळलेच नाही. पण त्या आणीबाणीच्या प्रसंगातही माझे डोके चालले आणि मी सुदर्शनकडे पाहण्याचे कटाक्षाने टाळले. नेत्रासमोर आमची ओळख उलगडायची नव्हती.
"हो हो.. बेटा मास्तरांना यासाठीच मी आज घरी घेऊन आलो, सहज वाटेत भेटले होते ते मला. आणि नेत्रा हे माझे कामातले मित्र.." सुदर्शनकडे हात दाखवत गणपतराव म्हणाले.
त्यांच्या बोलण्यावर नेत्राला कितपत विश्वास बसला कुणास ठाऊक पण नेत्राने पुन्हा मला पुकारले..
"मास्तर येताय ना.."
असं म्हणत नेत्रा आत तिच्या खोलीत गेली. मी चोरट्या नजरेने सुदर्शनकडे पाहीले, त्याने डोळ्यांनीच इशारा करून मला आत जाण्याचा इशारा केला. धडधडत्या छातीने मी उठलो आणि जड पावलांनी नेत्रा गेली त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागलो.
असं काही घडणार, हे सुदर्शनने मला रात्रीच सांगितले होते आणि मी त्या अनुषंगाने तयारीत होतो. जोपर्येंत खरंच काही धोका जाणवत नाही तोपर्येंत त्या शक्ती आपलं मूळ रूप समोर येऊ देणार नाही, हे मला माहीत होते. पण तरीही मनुष्यस्वभावाप्रमाणे मी मनाच्या द्विधा अवस्थेत त्या खोलीत पाय ठेवला.
माझ्यामागे खोलीचा दरवाजा आपोआप बंद झाला. जणू क्षणभरासाठी हवेचा मंद झोका माझ्या आसपास फिरला आणि आपले काम करून निघून गेला. खोलीतला दिवा मालवला होता. खिडक्या गडद पडदयाने झाकल्या होत्या. बाहेरचा प्रकाश आत येऊ न देण्याची विशेष काळजी घेतली गेली होती. कदाचित या अंधारात तिच्या शक्तीला विशिष्ट तेज प्राप्त होत होतं. तिच्या कुणाच्या..? नेत्राच्या..?
माझी भिरभीरती नजर समोर खुर्चीत बसलेल्या नेत्रावर पडली. पुन्हा तेच सगळं.. जे पहिल्या रात्री मला दिसलं होतं. नेत्राचे डोळे पुन्हा हिरवट दिसू लागले होते. परंतु चेहऱ्यावर कडवटपणा आला होता. प्रचंड चिडल्यासारखी ती आतल्याआत धुसमूसत होती. तिची विषारी नजर माझ्याकडे रोखून पाहत मला जाब विचारत होती.
तिचं ते रूप पाहून माझं काळीज धडधडू लागलं होतं. अंगाला घाम फुटला होता. भयाच्या त्या सावटाखाली स्वतःला सावरत मी कसेबसे भावनांवर अंकुश ठेवला होता. आतल्या खोलीतला एक एक क्षण माझ्यातल्या धैर्याची परीक्षा घेत होता.
"मास्तर.. मी सांगितलं होतं की मध्ये लुडबुड करू नकोस.." खोलीत नेत्राचा आवाज घुमला.
मी कपाळावर जमा झालेले घामाचे थेंब पुसले. उत्तरादाखल काहीतरी बोलणे आवश्यक होते. परंतु मनातली भीती माझ्या शरीरावर हावी होऊ पाहत होती. नेत्राच्या आसपास काळ्या वायुचं वलय निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. त्याचा उगम तिच्या त्या विषारी हिरव्या डोळ्यांतूनच होत होता. पुढे काय होणार याची कल्पना मला येऊ लागली होती. लवकरात लवकर तिच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार होते. पण जणू माझे ओठ शिवल्यासारखे भासत होते. तोंडातून शब्दच फुटत नव्हते.
काळा धूर एव्हाना खोलीत बऱ्यापैकी पसरला होता. तो मंद गतीने माझ्यापर्येंत पोहचण्याचा प्रयत्न करत होता. मला घाई करायला हवी होती. पण मनाच्या निर्धारापुढे माझे शरीर कमजोर पडू लागले होते. हा सुद्धा नेत्राचाच एखादा डाव असावा का की मला बोलताच येत नव्हते.. तो जहरी काळा वायू माझ्यापासून अवघा फुटभर अंतरावर आला आणि हतबल होऊन मी डोळे मिटले.
क्रमशः
निलेश देसाई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: