नेत्रा काणेकर भाग चार : सुदर्शन कथा
आतापर्येंत आपण ऐकलेत की नेत्राच्या घरी गेलेल्या मास्तर आणि सुदर्शन यांनी तिच्या आईवडिलांना संबंधित प्रकाराची कल्पना दिली. नेत्राच्या हरवलेल्या कपड्यांबाबत सुदर्शन विचार करतच होता की तितक्यात आतल्या खोलीतून बाहेर आलेल्या नेत्राने मास्तरांना तिच्या खोलीत येण्यास प्रवृत्त केले. तिथलं अभद्र वातावरण पाहून मास्तरांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली. त्यातच नेत्राचं बदललेलं रूप त्यांना पुन्हा एकदा धक्का देऊन गेलं. घरी येण्याविषयीचा जाब विचारताना नेत्राचा पारा चढला होता. तिच्या हिरव्या डोळ्यांतून पुन्हा काळा धूर बाहेर येऊ लागला होता आणि हे सगळं पाहून मास्तर पुन्हा आपल्या शरीरावरचं नियंत्रण हरवून बसले..
आता पुढे...
त्या बंद खोलीतल्या कोंदट वातावरणात काळ्या धुराने आणखीनच भर घातली होती. शरीरावर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात माझा श्वास भरून आला होता. डोळे विस्फारून मी माझ्यापर्येंत पोहोचणाऱ्या त्या काळ्या वायुला पाहत होतो आणि जेव्हा माझे प्रयत्न निष्फळ ठरू लागले तेव्हा भीतीपोटी माझा हात नकळत छातीवर आला.
त्याचक्षणी मला माझ्या शर्टच्या खिश्यात काहीतरी असल्याचे जाणवले. छातीवर आलेल्या माझ्या हाताचा स्पर्श अगदीच अजाणतेपणी त्या वस्तूला झाला होता. मी घाईतच निरखून पाहीले. आश्चर्य व्यक्त करत मी पटकन खिशातली ती वस्तू बाहेर काढली आणि माझ्या हाताची मूठ बंद केली. एवढीशी वस्तू.. पण किती आधार मिळाला होता मला तिचा.. जणू माझ्या शरीरात नुकतेच एखाद्या शक्तीने प्रवेश केला होता. आता मी बऱ्यापैकी सावरलो होतो. तात्काळ मी बोलण्यासाठी तोंड उघडले..
आणि उत्तरलो..
"हो, मला खरंच इथे नव्हतं यायचं.. पण तुझ्या वडिलांनी माझ्यापुढे पर्यायच ठेवला नाही.. वर त्यांच्यासोबत कोण तो त्यांचा मित्र आला आहे. तर सोबत गप्पा मारण्यासाठी मलासुद्धा घरी घेऊन आले.. शपथ.. नाहीतर मी एक सामान्य माणूस.. त्या प्रसंगानंतर माझी कुठे एवढी हिम्मत आहे की मी तूझ्या मार्गात येईन.." मी शक्य तितक्या कापऱ्या आवाजात म्हणालो.
सुदर्शनने सांगितल्याप्रमाणे मला नेत्राला गाफिल ठेवायचे होते.
माझ्या उत्तरानंतर नेत्राची काहीच प्रतिक्रिया आली नाही. कदाचित इतक्या तणावात दिलं गेलेलं माझं उत्तर आणि तिच्या बाबांनी अगोदर केलेला खुलासा यांत साम्य असल्यामुळे ती शांत झाली असावी. तिचा राग निवळल्याचे माझ्या ध्यानात आले कारण खोलीतला काळा वायू आता कमी होऊ लागला होता. खोलीचे दार आपोआप उघडले गेले आणि तिथून बाहेर जाण्याचा इशारा मी ओळखला होता.
नेत्राच्या खोलीतून बाहेर पडताच मी हाताची बंद मूठ उघडली आणि सुदर्शनकडे पाहत त्याचे मनोमन आभार मानले. तो गालात मंद हसला. मी पुढे जाऊन त्याचे सिद्ध तावीज त्याच्या हवाली केले. त्याने कधी ते माझ्या खिश्यात ठेवले मला कळले सुद्धा नव्हते. आत खरोखरच आणीबाणीचा प्रसंग उद्भवला होता परंतु माझे रक्षण करण्यास सुदर्शन सदैव माझ्यासोबत होता.
नेत्राच्या घरी अपेक्षेप्रमाणे आम्हाला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. गणपतराव आणि त्यांच्या पत्नीचा निरोप घेऊन सुरुवातीला मी आणि माझ्या मागे काही वेळातच सुदर्शन असे आम्ही दोघे घरी आलो.
घरी आल्यानंतर मी नेत्राच्या कपड्यांविषयी माझ्या मनातली शंका सुदर्शनला विचारली. मला ते गूढ जाणून घेण्याची खूप उत्सुकता आणि सोबतच नेत्राविषयी काळजी होती. माझ्या प्रश्नावर सुदर्शन फार गंभीर झाला. त्याच्या चेहऱ्यावर प्रथमच मला चिंता दिसत होती.
"सुदर्शन, नक्की काय खेळ सुरु आहे हा..?" मी पुन्हा विचारले.
सुदर्शन मान हलवत बोलू लागला..
"मास्तर.. जे काही मनात येतंय त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.. एक मन सांगतय की त्या प्रेतावर चढवलेले कपडे नेत्राचेच असावेत. परंतु दुसरं मन ईश्वराकडे प्रार्थना करत आहे, की हे खोटं ठरावं.. नाहीतर फार किचकट अश्या कोड्यात आपल्याला शिरावं लागेल. मी आत्ताचं ठामपणे काही सांगत नाही.. आपल्याला आतापर्येंत फक्त बारीकसारीक सुगावे लागले आहेत, पक्का पुरावा हाती लागला नाही. म्हणूनच आज रात्री पुन्हा आपल्याला त्या झोपडीकडे जावे लागेल. आशा करूया की तिथं यावेळी कुणीतरी भेटेल.."
यानंतर आमचे सायंकाळचे जेवण होईपर्येंत सुदर्शन गप्पच होता. त्याच्या मनात कसलंतरी विचारचक्र सुरु असावं. कितीतरी वेळ तो खिडकीत बसून दूर कुठेतरी पाहत होता. मी त्याच्या विचारांत व्यत्यय आणण्याचे टाळले. जेवण आटोपून आम्ही रात्री आठच्या सुमारास घराबाहेर पडलो आणि थेट नदीलगतच्या स्मशानापुढील झाडीकडे जाऊन दम घेतला. सुदर्शन एकदा आत झोपडीत जाऊन पाहून आला परंतु आत पूर्वीसारखीच परिस्थिती होती. झोपडीत राहणारी व्यक्ती आजही तिथे नव्हती. सुमारे दोन तास आम्ही झाडीत दबा धरून वाट पाहीली आणि शेवटी थकून आम्ही परतीच्या वाटेला निघालो.
"सुदर्शन.. तो जो कोणी असेल तो रात्री तरी आपल्या झोपडीत परतायला हवा की.. असा बाहेरच कितीवेळ भटकणार..?" मी हताशपणे विचारले.
"अश्या माणसांचा काही भरवसा नाही.. एकदा एखाद्या कामात गुंतले की मग त्यांना इतर कश्याची पर्वा नसते.. आपण उद्या सकाळी पुन्हा इथे येऊ.. त्याची भेट घ्यायला हवी.. जर त्यानेच हे सर्व घडवून आणले असेल तर त्याला ते निस्तरण्याची विनंती करायला हवी.." सुदर्शन माझ्याकडे न पाहता म्हणाला.
सुदर्शनच्या चेहऱ्यावर मला काहीशी अनिश्चितता दिसली. त्याचा 'विनंती' हा शब्द मला खटकला होता परंतु मी त्यावर भाष्य करण्याचे टाळले. रात्री थकून घरी आल्यावर झोप कधी लागली कळलेच नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही पुन्हा त्या ठिकाणी गेलो परंतु कदाचित दैव आमची परीक्षा पाहत होते. दिवसभर उपाशीपोटी थांबूनसुद्धा तिथं कुणी आलंच नाही. यावेळी मात्र माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. मी याबाबत सुदर्शनकडे विचारणा केली.
"मास्तर, असल्या कामात संयम खुप महत्वाचा. मंत्रशक्तीने त्याला इथे घेऊन येणं माझ्यासाठी अवघड नाही.. परंतु ते शिष्टाचारात बसणार नाही. कदाचित विनंती करून आपले काम झालेच तर पुढे येणारे संभाव्य धोके टाळता येतील. एकतर तो कोण आहे, त्याची साधना कितपत पक्की आहे याबाबत आपल्याला कल्पना नाही. म्हणुन पावलं जरा जपून टाकायची आहेत. असो, आपल्याकडे दुसरा पर्याय आहे.." सुदर्शन शांतपणे म्हणाला.
"दुसरा पर्याय.. तो कोणता..?" मी विचारले.
यावर सुदर्शन हसला आणि म्हणाला..
"नेत्राला भेटणारच इसम विसरलास का.."
माझ्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला. त्याच्याबद्दल तर मी साफ विसरूनच गेलो होतो. तो सापडल्यावरसुद्धा या झोपडीच्या रहस्यासंबंधी काहीतरी माहीती मिळाली असती. म्हणजे आमच्या पुढचे सारेच मार्ग बंद झाले नव्हते तर..
मी होकारार्थी मान हलवून सुदर्शनच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
पुढचे दोन दिवस आम्ही नेत्रावर पाळत ठेवली पण ती सुद्धा घराबाहेर पडली नाही. माझ्या मनात पुन्हा एकदा नैराश्याचे काळे ढग जमा होण्यास सुरुवात झालीच होती की अखेर ती संध्याकाळ उगवलीच.
सायंकाळी सातच्या सुमारास नेत्रा घराबाहेर पडली आणि आमचा पाठलाग सुरु झाला. यावेळी तिच्यापासून बरंच अंतर ठेऊन मी आणि सुदर्शन पुढे जात होतो. ती कोठे जाणार याची आम्हाला कल्पना होती. आज जरा लवकरच अंधारून आलं होतं. वातावरणात गारवा होता. अंगावर शहारे आले होते पण ते या शोधकाऱ्याच्या उत्सुकतेमुळे येत होते. गावाची वेस ओलांडून आम्ही नदीकडे जाणाऱ्या पायवाटेवर आलो तेव्हा दुरूनच आम्हाला नेत्राची आकृती दिसली. आमच्या पुढे ती तिच्या मंद चालीने चालत होती.
सुदर्शन आणि मी जरासाही आवाज न होऊ देता तिच्या मागेमागे चालत होतो. आज कोणत्याही परिस्थितीत त्या इसमाला गाठायला हवं होतं, नाहीतरी आमचे प्रश्न अनुत्तरीतच राहीले असते. त्याच्याबरोबरचा मागचा अनुभव माझ्या चांगलाच लक्षात होता. आज सुदर्शन सोबत असल्यामुळे त्याची परतफेड करण्याची माझी मनोमन इच्छा होती.
परंतु माझा अपेक्षाभंग झाला. जसजसे नेत्रा आणि त्या इसमाच्या भेटीचे ठिकाण जवळ येऊ लागले, तसतसे सुदर्शन दबक्या आवाजात मला सूचना करू लागला. मला नेत्रासमोर जाणे टाळायचे होते, इतकेच काय त्या इसमाशीसुद्धा सुदर्शन स्वतः बोलणार होता. मला फक्त बघ्याची भूमिका घ्यायची होती, ते देखील नेत्रा तिथून गेल्यानंतरच...
एक ठिकाणी झाडाचा आडोसा घेत आम्ही थांबलो. नेत्रा त्या ठिकाणी पोहोचली होती. काळोख गडद पसरला होता त्यामुळे तिच्या सावलीची हालचाल मध्येमध्ये दृष्टीआड जात होती. तिथं अजून तरी कुणी पोहचले नव्हते. आज तरी आमची प्रतीक्षा फळाला येईल का..? माझ्या डोक्यात तो फुटकळ प्रश्न आला आणि नदीकडच्या वाटेवरून आम्हाला एका पुरुषाची काळी आकृती जवळ येताना दिसलीच.
"हा तोच असावा.." मी सुदर्शनाच्या कानात पुटपुटलो. त्याने मला शांत राहून वाट पाहण्याचा इशारा केला.
हळूहळू आसपासच्या परिसरात नजर फिरवीत तो इसम नेत्राजवळ आला. सगळं काही आमच्या समोर घडत होतं परंतु आमच्या अस्तित्वाची भनक अजून तरी त्यांना जाणवली नव्हती. रात्रीच्या नीरव शांततेत आणि मोकळ्या पसरलेल्या त्या जागेत वाऱ्याची दिशा आमच्या बाजूला असल्याने तिकडची हलकीशी कुजबुज आमच्या कानी पडू लागली होती. मी कान टवकारून बारकाईने त्यांचे संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो.
पण तितक्यात सुदर्शन पुढे सरसावला. तो सरळ त्यांच्या दिशेने वेगाने चालू लागला. अगोदर मिळालेल्या सूचनेनुसार सध्यातरी मला तिथे जाता येणार नव्हते. पण मी दुरूनच तिकडे घडत असलेल्या घडामोडीचा आढावा घेत होतो. सुदर्शन तिथे पोहचला आणि तिथल्या हालचालीत वेग आला होता. तो अनोळखी इसम सुदर्शनकडे पाहत हातवारे करून काहीतरी बोलत असावा. नेत्रा अचानक माघारी फिरली आणि घराच्या दिशेने येऊ लागली. मी तिच्या वाटेतच झाडाच्या आडोशाला उभा होतो. तिला पुढे येताना पाहून माझ्या काळजात धडधड होत होते.
पण सुदैवाने ती मला पार करत सरळ घराच्या दिशेने निघून गेली. ती पुरेशी दूर जाताच मी लगबगीने सुदर्शनकडे धावलो आणि तिथल्या संभाषणात भाग घेतला. मला पाहताच तो इसम त्वेषाने बोलू लागला..
"अच्छा.. म्हणजे तू आहेस का यामागे..? तूला एकदा सांगून कळले नाही ना... थांब तुझ्या तर.." असे म्हणत तो इसम माझ्यावर धावून आला परंतु सुदर्शन त्याला आडवा गेला.
"हे बघ कपटी माणसा... तू काय कुकर्म केले आहेस याचा पत्ता आम्हाला लागला आहे.. बऱ्याबोलानं सांग की नेत्रावर काय जादू केली आहे ते.. नाहीतर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव.." सुदर्शनने कडक शब्दांत त्याला फटकारले.
पण तो इसम मात्र नरमला नाही. वरून तो आणखी माज दाखवत सुदर्शनला म्हणाला..
"आता तू आलायस पुढे पुढे करायला.. अरे मूर्खांनो.. मी काय चीज आहे ते तुम्ही ओळखत नाही.. मच्छर आहात तुम्ही माझ्यासमोर.. आणि नेत्राच्या भानगडीत तर लक्षच घालू नका.. प्रेम आहे माझं तिच्यावर.. आणि त्यासाठीच हे सगळं केलंय मी.. जादू नाही.. काळी जादू.. हाहाहाहा... काय भीती वाटली ना.. शहाणे असाल तर गपगुमान निघा आता.."
त्याच्या फुशारकीची मला कीव येऊ लागली होती. पण हे सगळं तो त्या शक्तीच्या जीवावर बोलत होता, जिचे सहाय्य त्याला मिळाले होते. सुदर्शनने त्याचे म्हणणे शांतपणे ऐकले. अनायासे त्याने आपल्या कृत्याची थोडीफार कबुली दिलीच होती. त्याला अधिक न डिवचता सुदर्शनने आपल्या खिश्यातून एक कागद बाहेर काढला आणि आपल्या शबनम पिशवीत हात घालून काहीतरी शोधू लागला. त्याला पेन हवा असणार, मी तत्परतेने माझ्याकडील पेन काढून त्याच्या पुढ्यात धरला. परंतु सुदर्शनने तिकडे लक्ष न देता शबनम मधून पेन बाहेर काढलाच.
तो इसम एव्हाना मागे फिरणारच होता की सुदर्शनने त्याला थांबवले. मला टॉर्चचा प्रकाश पुढे करण्यास सांगून सुदर्शन त्या कागदावर काहीतरी लिहू लागला. तो इसम वैतागलेल्या चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होता.
"हे ठेव तुझ्याजवळ.. कदाचित रात्री अपरात्री तूला माझी गरज भासेल. तेव्हा मी या पत्त्यावर भेटेन तूला.." सुदर्शन सौम्य आवाजात म्हणाला.
"मला काय गरज पडणार तुझ्यासारख्या माणसांची..?" रागाने बोलत त्या इसमाने तो कागद फाडायला घेतला.
"तो मूर्खपणा करू नकोस.. तूला माझी गरज पडणार ही काळ्या दगडावरची रेष आहे.. आणि हे आज रात्रीच होणार.. पुन्हा बोलू नकोस मी चेतावणी दिली नाही ते.." सुदर्शनचा आवाज कठोर झाला होता.
सुदर्शनच्या इशाऱ्यावर मात्र तो इसम काहीसा चपापला. टॉर्चच्या प्रकाशात मी पाहीले, त्याचा चेहरा संभ्रमात पडला असल्यासारखा भासला. कदाचित आपण एवढी काळ्या जादूची धमकी देऊनसुद्धा सुदर्शन रस्त्यातून हटत नाही म्हटल्यावर नक्कीच यात काहीतरी बात असणार, हे त्या इसमाने ओळखले असावे. त्याने सुदर्शनकडून तो कागद हिसकावला आणि तिथून तो तडक गावाच्या दिशेला निघून गेला.
सुदर्शनच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होते. मला मात्र यातले काहीच कळले नव्हते.
"सुदर्शन.. नक्की काय झाले.. काय होणार आहे त्याच्या सोबत.. आणि कसे? आपण त्याला असंच जाऊ देऊन चूक तर नाही ना केली.. आज संधी होती त्याच्याकडून सारं काही बाहेर काढायची..?" मी प्रश्नांची सरबत्ती केली.
"मास्तर.. कोण म्हणालं की आपण त्याला असाच जाऊ दिला..? आपलं हत्यार त्याच्यासोबत राहील.. किमान आजची रात्र तरी.." सुदर्शन गूढ आवाजात म्हणाला.
"हत्यार.. कसलं हत्यार..?" मी पुढचा प्रश्न विचारला.
यावर खुलासा करत सुदर्शन बोलू लागला..
"मास्तर, ते पेन काही साधंसुध नाही.. वयस्क घुबडांचे मंत्रौपचार केलेले रक्त त्याच्या शाईमध्ये मिसळले आहे.. मी लिहिलेल्या शब्दांत या पक्ष्यांचे आत्मे दडून बसले आहेत. ते काहीही करू शकतात. हुकुमानुसार एखाद्याला घाबरवू शकतात वा एखाद्याचा बळी देखील घेऊ शकतात. हाहा.. आपल्या मित्राची आजची रात्र फार भयानक जाणार आहे.. जागा रहा.. मध्यरात्री कधीही दारावर थाप पडू शकते..."
सुदर्शनच्या एकेका वाक्यासोबत माझ्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणखी गडद होत जात होते. डोळ्यांसमोर तो इसम आणि त्याचा पाठलाग करणारी असंख्य घुबडे मला दिसू लागली होती.
क्रमशः
निलेश देसाई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: