चिंद - घाटावरचे भूत | मराठी भयकथा | सुदर्शन कथा | Marathi Horror Story | Marathi Bhaykatha | Horror Stories




 मागे मी तुम्हाला माझ्या जनार्दन नावाच्या मित्राची गोष्ट सांगितली होती. तुम्हाला आठवतोय का तो इसम.. ज्याने जनार्दनची त्या रक्तपिपासू हडळीपासून सुटका केली होती. त्यावेळी वाटले होते की पुन्हा कधी त्याच्याशी भेट होईल की नाही काय माहीत.. पण योगायोगाने एकदा तो भेटलाच. मी जनार्दनच्या संदर्भात त्याचे आभार मानले. सुदर्शन नाव होते त्याचे. साधारण माझ्याच वयाचा.. पंचवीशीतला... त्याचा मोबाईल क्रमांक घेतला.. तर अशी आमची तेव्हा फक्त ओळख झाली होती. पण त्या भेटीत मला माहीत नव्हते, की या ओळखीचे रूपांतर पुढे घट्ट मैत्रीमध्ये होईल असे.

 तर आमची मैत्री जुळण्यामागे आणखी एक प्रसंग कारणीभूत ठरला. तोच आज आपल्याला सांगत आहे. माझी साताऱ्यामधल्या एका खेडेगावात बदली झाली होती, तेव्हाची ही गोष्ट.

 सुरुवातीला नोकरी करत मी शिक्षण पूर्ण केले आणि माझ्याच गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम पाहू लागलो. उन्हाळ्यात बदलीचा आदेश आला तेव्हा शाळेतली कामं उरकली होती. पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी मला साताऱ्यामधल्या एका छोट्याश्या खेडेगावातल्या शाळेत सेवा द्यायची होती. राहण्यासाठी निवासस्थानाची सोय होतीच.

 सामानसुमान घेऊन मी माझ्या नव्या निवासस्थानी येऊन पोहचलो तेव्हा माझ्या नव्या शेजार्यांनी माझी किती आपुलकीने विचारपूस केली. शेजारचे मधुकरराव बोलक्या स्वभावाचे असल्याने त्यांनी माझ्याबद्दल बरीच माहिती काढून घेतली. मी एकटाच असल्याने त्यांनी हक्काने मला घर साफसूफ करण्यास मदत केली. त्यांच्या पत्नीने तर पहिल्या दिवशी मला रात्रीच्या जेवणाला येण्याचा आग्रह केला.

 सुरुवातीला का कु करत एकदाचा मी तयार झालो.  दिलेल्या वेळेप्रमाणे रात्री ठीक नऊच्या सुमाराला मी फाटकाजवळ हजर होतो.

 माझ्या निवासस्थानाच्या बाजूलाच मधुकररावांचं प्रशस्त असं घर आहे. समोर पाहीले तर दोन माळ्यांचं टूमदार घर ऐटीत उभं दिसलं. पुढ्यात अंगण, अंगणात छोटीछोटी फुलझाडं.. एका बाजूला पाण्याची विहीर होती. बाहेरून पाहताक्षणी असं वाटावं की त्या घरात एखादं सुखी कुटुंब नांदत असावं.

 मी फाटक उघडून आत जाऊ लागलो. तसं उजव्या हाताला सळसळ जाणवली. मी झटकन वळून तिकडे पाहीले. एक मध्यम आकाराचे उंबराचे झाड आपल्या फांदया हलवून तिथल्या शांत वातावरणात सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.

 त्याच्याकडे पाहत मी त्याचं निरीक्षण करत होतो. त्याचा आकार अगदीच विस्तृत नसला तरी पसरलेल्या फांदया अस्ताव्यस्त वाढल्या होत्या. खोडाचा भाग ओबडधोबड वाटत होता. बरीच पानं गळली होती. खाली जमिनीवर सुकलेल्या पानांचा सडा साचला होता. बाकी अंगण कसे चकचकीत साफ केल्यासारखे होते पण या इथे.. या उंबराच्या झाडाखालीच तेवढी सुकी पाने आणि खाली पडून फुटलेल्या उंबरांची रास जमा झाली होती.

 अंगणात उभा राहून मी विस्मयाने त्या उंबराकडे  पाहतच होतो की मधुकरराव बाहेर आले.

 "या.. या.. मास्तर... चला आत.. जेवण तयार आहे..." मधुकररावांनी हसतमुखाने अतिशय प्रेमाने माझे स्वागत केले.

 मी चेहऱ्यावर स्मित आणत त्यांना अभिवादन केले आणि कुतूहल म्हणून त्यांना विचारले.

 "का हो मधुकरराव.. सगळं अंगण इतके स्वच्छ आहे. मग ही एवढीच जागा का अशी..?"

 मी सहज म्हणून हा प्रश्न विचारला पण मधुकररावांच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळल्याचे मला जाणवले.

 "अं.. काही नाही हो मास्तर.. वर्षभरापूर्वी इथं राहायला आलो तेव्हापासून तिथं सफाई करण्याचा 
सुरुवातीला प्रयत्न करून पाहीला.. पण प्रत्येकवेळी झाडू हातात घेऊन तिकडं जावं तर अचानक एखादा साप समोर येतो.." मधुकरराव चिंतीत होऊन सांगत होते.

 "अरे बापरे..." मी नवल व्यक्त करत मधूनच त्यांना प्रतिक्रिया दिली. 

 "हो मग.. पहिल्यांदा तर घाबरलो आम्ही.. सापाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण सापडलाच नाही कधी.. हा पण बाकी घराच्या आसपास कधी दिसला नाही.. त्यामुळे नंतर तसा काही धोका नाही जाणवला. म्हणून तिकडं आम्ही साफसफाई करण्याचं टाळतो..." मधुकरराव सांगत होते.

  "अच्छा.. असं आहे तर... बरं मग या उंबराच्या झाडाची तरी अधूनमधून छटाई करायची की... म्हणजे जरा कमी कचरा होईल.." मी बारीक नजरेने त्या अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडाकडे पाहत म्हटले.

  "नाही हो मास्तर.. ते देखील करून पाहिलं.. पण फांदया छाटायला ह्या झाडावर चढलेला माणूस खाली पडून वारला.. तुम्हाला सांगतो.. चांगला चपळ गडी होता.. आपल्या कामात तरबेज एकदम.. कितीतरी मोठी झाडं त्यानं छाटली असतील. पण या उंबराच्या झाडावर चढल्यावर त्याचं चित्त हरवल्यासारखं करायला लागला. मी खालीच उभा होतो.. त्याला अचानक काय झालं काय माहीत.. पण तोल जाऊन खाली पडला तो.. पुन्हा उठलाच नाही..." अतिशय खेदपूर्ण स्वरांत मधुकररावांनी खंत व्यक्त केली.

  मी ही हकीकत ऐकून जरा संभ्रमातच पडलो होतो.

 "अरेरे.. खूप वाईट झाले.." मी देखील मान हलवत सहानुभूती दर्शिवली.

 "म्हणून मग ही एवढी झाडाजवळची जागा अपशकुनी आहे, असं मानून आम्ही तिकडे लक्ष दिले नाही. तिथपासून आम्ही ही उंबराजवळची जागा आमची नाहीच असंच समजून चाललो आहे." मधुकररावांनी पुढे पुष्टी जोडली.

 "विलक्षण प्रकार आहे हा तर.." मी खांदे उडवत शेवटची प्रतिक्रिया दिली. तसे मधुकररावांनी विषयाला बगल देत मला आत चलण्याचा आग्रह केला.

 घरात आतमध्ये प्रवेश करताच मला मधुकररावांच्या आर्थिक सुबत्तेची एकूण कल्पना आली. मधुकरराव उच्च मध्यमवर्गीय गटात मोडत होते. पाहुण्यांसाठी सोफे, भिंतीवरच्या पेंटिंग्स, सागवानी लाकडाचे भलेमोठे कपाट, पायाखालच्या महागड्या फरश्या.. ही सगळी श्रीमंतीचीच लक्षणे होती.

 थोडावेळ इतर गप्पा करत आम्ही वेळ घालवला. ताट लावली गेली तसं आम्ही हात धुवून जेवणाला बसावयास गेलो. मधुकररावांनी हाक दिली तशी त्यांची चिल्लीपिल्ली वरच्या खोलीतून खाली आली. मघाशी गप्पांमध्ये सांगितल्याप्रमाणे मधुकररावांची तीन मुले.. मंदा आणि नंदा अश्या दोन मुली आणि त्यानंतरचा सर्वात लहान पाच वर्षांचा सुदाम.. खूप गोड.. गोरापान.. गुबगुबीत आणि चटपटीत बडबड्या सुदाम.. 

 मी पाहताक्षणीच त्याला जवळ बोलावले. पण त्याने रुक्षपणे मान हलवत नकार दिला. लहान मुले सहजासहजी कुठे अनोळखी माणसांकडे जातात तेव्हा. मी हसून दुरूनच सुदामला चुचकारू लागलो अन तो भिरभीरत्या नजरेने मला आपादमस्तक न्याहाळत होता.

 मधुकररावांच्या पत्नी सुमित्रादेवी लगबगीने बाहेरच्या खोलीत आल्या आणि आम्हाला जेवण वाढले. मी, मधुकरराव आणि त्यांची तीन मुले असे जेवायला बसलो होतो. सुमित्रादेवी कुणाला काय हवे नको ते पाहत सुदामच्या बाजूलाच बसल्या होत्या. जेवण शाकाहारी आणि सुग्रास होते. मी सवयीप्रमाणे खाली मान घालून शांतपणे जेवत होतो. सहसा जेवताना मी फारसं कुठे लक्ष देत नाही पण मला त्या प्रसंगात काहीतरी वेगळेपणा जाणवत होता.

 खरं म्हणजे सर्व काही उत्तमरित्या पार पडत होते. पण असं होतं ना कधीकधी की एखाद्या गोष्टीकडे पाहताना आपल्याला एका बाजूने सर्व काही ठीक वाटतं पण मनात दुसऱ्या बाजूला कुठेना कुठे चलबिचल होत असते. एखाद्या उत्कृष्ट घटकामध्ये जसा काहीतरी फोलपणा जाणवतो. एखादे उत्तम चित्र आवडले असूनही जशी त्यात काहीतरी विसंगती वाटते.. अगदी तशीच तरंगं त्यावेळेला माझ्या मनामध्ये उमटत होती.

 मी मान खाली घातली असली तरी माझ्या नेत्रकटाक्षाची झेप सुमित्रादेवींपर्येंत पोहचत होती. त्यांचा हात थांबत नव्हता. सारखं ताटातलं काही ना काही संपत होतं. कधी वरण.. कधी चपाती.. कधी पापड... सुमित्रादेवींचा हात अविरतपणे आपलं काम करत होता.

 मी दृष्टीपुढे तो नजारा स्पष्टपणे आणण्यासाठी सरळ तिकडे मान फिरवली आणि पाहतो तर...

 पाच वर्षांचा सुदाम एखाद्या पैलवानाचा खुराक खाल्ल्यागत जेवण फस्त करत होता. शांत, धीरगंभीर मुद्रा घेऊन तो जेवण करण्यात मग्न झाला होता. असं बोलू नये, पण खरंच एकक्षण मला वाटले की सुदामला भस्म्या वगैरे झालाय की काय..?

 मधुकररावांचे माझ्याकडे लक्ष जाताच त्यांनी घश्यात खाकरण्याचा अभिनय केला. आमची सर्वांची नजर त्यांच्यावर गेली. त्यांनी सुमित्रादेवींना केलेला इशारा मी ओळखला. सुमित्रादेवी लगबगीने सुदामला घेऊन आत जाण्यासाठी उठल्या. पण तोपर्येंत सुदामचे जेवण आटोपले होते. फुगलेल्या गरगरीत पोटावरुन हात फिरवत तो उठला आणि वरच्या खोलीच्या दिशेने निघून गेला. तितका वेळ मी फक्त आ वासून पाहतच राहिलो होतो. पाच वर्षांच्या मुलाकडून असे काही अपेक्षित नव्हतेच. 

  "आमच्या सुदामाचा खुराक जरा जास्त आहे. त्याला चांगला पैलवान बनवणार आहे मी..." मधुकररावांच्या चेहऱ्यावर एकाचवेळी ओशाळल्याचे आणि गर्वाचे भाव अवतरले.

 मी काहीच म्हणालो नाही. फक्त मान डोलावली. मोठी विचित्र गोष्ट होती ही. बाहेरचे उंबराचे झाड, क्वचित दिसणारा साप आणि आता हा सुदाम. वरवर ठीक वाटत असणाऱ्या या घरात मला काहीतरी अनैसर्गिक जाणवत होते. प्रश्न बरेच पडले होते. पण पहिल्याच भेटीत फारसं खाजगी जाता येत नव्हतं मला.

 जेवण झाल्यावर आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो. यावेळी माझी वेळ होती. गप्पांच्या ओघात मी मधुकररावांकडून आवश्यक ती सर्व माहिती काढून घेतली. एक वर्ष झाले होते त्यांना या घरात येऊन. इथे आल्यापासून सुरुवातीचे उंबराच्या झाडाजवळील साप, छटाई करणाऱ्या माणसाचा मृत्यू इत्यादी अपवाद वगळता विशेष असे काहीच नव्हते. हा पण सुदाम मात्र नवीन घरात आल्यावर दोनचार दिवस आजारी पडला होता. आजारातून उठला तसा त्याचा आहार वाढला. वाढतं अंग असल्यामुळे मधुकरराव आणि सुमित्रादेवींनी कौतुकाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.

 मी खरे सांगतो, जनार्दनचा किस्सा घडल्यापासून मी अश्या गोष्टींकडे विशेष नजरेनेच पाहतो. स्वतः अनुभव घेतला आहे, म्हणून ताकसुद्धा फुंकून पितो मी..

 त्यामुळे मनातल्या शंकेची शहानिशा करण्याचे ठरवले. काही दिवस सुदामवर दुरूनच पाळत ठेवली. माझ्या घरातल्या खिडकीतून मधुकररावांचे अंगण स्पष्ट दिसायचे. मी त्या खिडकीशेजारीच्या भिंतीकडे पलंग सरकावून माझी झोपण्याची जागा बदलली. दिवसा शाळेतल्या कामात असल्याने मला रात्रीचाच वेळ असायचा. कधी लवकर झोप लागायची नाही तेव्हा मी खिडकीबाहेर बघत बसायचो. दिवस सरत होते, रात्री धावत होत्या. खिडकीबाहेर पाहण्याच्या माझ्या वेळा बदलत होत्या. आणि एक दिवस अपेक्षेप्रमाणे मला जे हवे ते दिसलेच.

 रात्रीचे दोन वाजले होते. झोपेत खोकल्याची उबाळी आली म्हणून मी पाणी घेण्यासाठी उठलो. पाणी पिताना सहज म्हणून नजर खिडकीबाहेर गेली आणि मी चक्रावलो.

 मधुकररावांच्या अंगणातला विजेचा दिवा रात्रभर जळत असायचा. बाहेरच्या रस्त्यावर काळोख पसरला होता. लहानगा सुदाम उंबराच्या झाडाकडे पाहत उभा दिसला. त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडत असल्याने मी साफ पाहू शकत होतो की त्याची नजर शून्यात हरवली होती. सुदामचे पाणीदार डोळे फक्त नावाला उघडे होते. पण त्यातली विवशता मी माझ्या खिडकीतून अनुभवू शकत होतो. मला रानातून हडळीच्या वाटेकडे जाताना अनुभवलेली जनार्दनची ती नजर आठवली. माझ्या काळजात चर्रर्र झाले. हृदयावर दगड ठेऊन मी काहीकाळ पुढे काय घडत आहे ते पाहण्याचे ठरवले.

 सुदाम एकाग्र चित्ताने उंबराच्या झाडाकडे पाहत होता. उंबराचे ते झाड आपल्या वेड्यावाकड्या फांदया अधूनमधून हलवत होते. जणू ते काही प्रश्न विचारत असावे.. एखादी वाऱ्याची झुळूक येई आणि हवेसोबत सुदामचे भुरभूरणारे मऊशार केस विस्कटून जाई. मग कठोर बनलेल्या सुदामच्या चेहऱ्यावर काही भाव उठत आणि 'हो' अथवा 'नाही' अश्या ईशाऱ्याप्रमाणे मुंडी हलून त्या उंबराच्या झाडाला प्रतिसाद मिळे.

 इकडचा घातकी प्रकार माझ्या ध्यानात आला. समोरचे दृश्य विचित्र असले तरी मी त्यात आत्ताचं हस्तक्षेप करू शकत नव्हतो. मधुकरराव आणि सुमित्रादेवी या प्रकारापासून अनभीज्ञ होते, म्हणून त्यांच्याबद्दल मला फार कीव वाटत होती. मला लवकरात लवकर यावर उपाय शोधायचा होता आणि यावेळी माझ्या माहितीत योग्य माणूस होता.

 सुदर्शन.. हो सुदर्शनचं.. त्यानेच जनार्दनला वाचवले होते. मला खात्री होती की यावेळीदेखील तो नक्कीच माझ्या हाकेला प्रतिसाद देईल.

अंगणातला सुदाम पुन्हा घरात गेल्याचे पाहताच मी सुटकेचा निःश्वास टाकला आणि ताबडतोब रात्री अडीच वाजता मी सुदर्शनला फोन लावला. थोडक्यात अतिमहत्वाचे काम असल्याचे सांगून मी सुदर्शनला पत्ता दिला. त्याने दुसऱ्या दिवशी दुपारपर्येंत पोहोचण्याचे कबूल केले.

 सोबतीला कोणीतरी जाणकार माणूस नसेल तर अश्यावेळेला आपण खरंच किती हतबल होऊन जातो, याची प्रचिती मी आज पुन्हा घेतली होती. पण सुदर्शनच्या होकारामुळे माझी चिंता तूर्तास मिटली होती.



 ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दुपारी सुदर्शन माझ्या घरी हजर झाला. काल रात्री मी त्याला फक्त वरवर सुदामचे वर्णन केले होते. उंबराच्या झाडाबद्दल मी फारसे काही सांगितले नाही. मधुकररावांना पूर्वी आलेले अनुभव, साप, छटाई करणाऱ्या माणसाचा मृत्यू आणि सुदामचा खुराक.. बस्स.. इतकेच मी त्याला सांगितले. खरंतर मला पाहायचे होते की सुदर्शन उंबराच्या झाडाबद्दल काय विचार करेल.. त्याचं मन मला पूर्वग्रहदूषित करायचे नव्हते.

 सुदर्शनने एकवार खिडकीतून बाहेर नजर टाकली. काहीक्षण निरीक्षण केल्यावर त्याने माझ्याकडे वळून पाहीले आणि स्मित करत तो बोलू लागला.

  "हम.. आता तु मास्तर झालास म्हणून माझीपण परीक्षा घेणार का.. सगळीच माहिती मला सांगितली नाहीस.. खरे ना..." सुदर्शनने हसतहसत प्रश्न विचारला होता.

  "अहो.. खरंच असं काही मनात नव्हतं.. पण.." मी पुढे बोलत होतो पण त्याने मध्येच मला थांबवले.

  "असू दे.. मी परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवतो.. मग तर झालं..." सुदर्शनच्या स्वरात आत्मविश्वास झळकत होता.

 आमचे संभाषण तिथेच थांबले. सुदर्शनने आपल्या शबनम पिशवीतून एक एक वस्तू बाहेर काढल्या. ओढवणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेत त्याने सगळ्या वस्तू पडताळणी करून पुन्हा आत ठेवल्या. एका कागदावर काही आकडेमोड केली आणि सायंकाळी सात वाजल्यानंतर मधुकररावांच्या अंगणात जाण्याचे नक्की केले.

 "मास्तर.. मला थरार निर्माण करणाऱ्या, उत्सुकता ताणून ठेवणाऱ्या गोष्टी आवडत नाहीत. असल्या प्रकारात एखाद्याच्या जीवावरदेखील बेतू शकतं. त्यामुळे एक घाव दोन तुकडे करणे कधीही चांगले. यावेळीही आपल्याला तसेच करावे लागेल आणि मला तुझीही मदत लागेल. तिकडे आईवडिल आणि इतर दोन मुलीही आहेत त्यामुळे त्यांना काही धोका नको, अशी काळजी आपल्याला घ्यावी लागेल.. " सुदर्शनने मला सर्वकाही समजावले.

 मी माझ्याकडून होईल ते करण्याचा निर्धार बोलून दाखवला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मी मधुकररावांच्या अंगणात हजर झालो. सुदर्शन माझ्या घरीच थांबला होता. तो काही क्षणांत तिथे पोहचणारच होता पण त्याअगोदर मला माझे कामं पूर्ण करावयाचे होते. सुदर्शनच्या आगमनाची खबर पोहचेपर्येंत मला सुदामला वेसण घालायचे होते.. मी नेहमीच्या हसतमुखाने मधुकररावांच्या घरात प्रवेश केला. मधुकरराव सोफ्यावर बसले होते. सुमित्राबाई आत स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या होत्या. मुली आतल्या खोलीत खेळत होत्या. सुदाम स्वयंपाकघराकडे डोळे लावून बसला होता.

  मला पाहतच मधुकरराव प्रसन्न चेहऱ्याने उठले आणि अभिवादन करायला पुढे सरसावले. पण मी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही.. तडक सुदामकडे जात मी माझ्याकडची गोड दुधाची बाटली त्याला देऊ केली. त्याने किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहीले. माझ्या मनात तेव्हा अपराधीपणाची भावना दाटून आली. 'याला खरं काय ते कळालं तर मला उचलून फेकून द्यायला सुद्धा कमी करणार नाही', असा विचार मनात आला. हो.. सुदर्शनने दिलेल्या माहितीप्रमाणे सुदाम काहीही कारू शकत होता.

 सुदामने माझ्या हातातली बाटली हिसकावली. मधुकरराव आश्चर्यचकीत होऊन तो प्रकार पाहत होते. माझा नाईलाज होता. सुदामने पटकन बाटली उघडून तोंडाला लावली आणि घटाघटा सर्व दूध प्यायला. दुसऱ्याच क्षणी त्याच्या हातातली बाटली खाली पडली आणि पाठोपाठ सुदामदेखील जमिनीवर आडवा झाला.

 मधुकरराव ओरडत धावले, पण मी त्यांना शांत राहण्यास सांगितले. सुदामला अलगद उचलत मी बाहेर अंगणात आणले. एव्हाना सुदर्शन फाटक ओलांडून आत आला होता. उंबराच्या झाडासमोर येऊन त्याने हातातली भस्माची पुडी सोडली आणि खाली जमिनीवर एक मोठे वर्तुळ काढले. त्याची कृती पूर्ण होताच मी सुदामला त्या वर्तुळात ठेवले. बेशुद्ध अवस्थेतील सुदाम निपचित पडला होता.

 या प्रकाराने चिडलेल्या मधुकररावांनी माझ्याकडे खुलासा मागितला. सुमित्रादेवीसुद्धा बाहेर अंगणात आल्या. मी मधुकररावांना जमेल तसं शांत राहण्याची विनंती केली. सगळं आटोपल्यावर तुम्हाला कळेलच, असे देखील सांगितले.

 माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. पण कदाचित त्यांना आपल्या मुलाच्या बाबतीत काही वाईट प्रकार घडत असल्याचे आणि हे सगळे मी करत असल्याची शंका असावी, म्हणून ते पुन्हा माझ्या अंगावर धावून आले. यावेळी त्यांच्या डोळ्यांतली आग मला स्पष्ट जाणवली. त्यांच्यापासून वाचण्यासाठी मी थोडासा पुढे सरकलोच होतो की, त्या एका क्षणात तीन कृती घडल्या.

 माझ्या जागेवर मधुकरराव पोहचले..

 उंबराच्या झाडाची एक भलिमोठी फांदी खाली त्या जागेवर कोसळली..

 आणि सुदर्शनने चपळता दाखवत मधुकररावांना त्या फांदीपासून वाचवले...

 मला हायसे वाटले.

 "तुमचा मुलगा फक्त बेशुद्ध आहे.. आणि तो जिवंत राहावा, असे वाटत असेल तर आम्हाला आमचे काम करू द्या..." सुदर्शनने एवढेच सांगितले आणि मधुकरराव शांत झाले. जणू सुदर्शनच्या आवाजात काही जादू होती की त्याने कसलीशी मोहिनी घातली कुणास ठाऊक.. पण पुन्हा मधुकररावांच्या तोंडून चकार शब्द निघाला नाही.

 सुदर्शनने एक जळजळीत कटाक्ष उंबराच्या झाडाकडे टाकला. शबनम पिशवीतून त्याने एक छोटीशी कुपी बाहेर काढली आणि मंत्र पुटपुटत त्यातले द्रव उंबराच्या झाडावर शिंपडले. तितक्यात त्या झाडाच्या फांदया सळसळू लागल्या. जणू जळजळ उत्पन्न करणारे एखादे रासायनिक आम्ल अंगावर पडले, म्हणून वेदनेची प्रतिक्रिया आली.

  "लहान मुलाच्या आडून स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा काय लाभ.. चालता हो इथून..." सुदर्शनचा कठोर आवाज अंगणात घुमला. जणू तिथं काय आहे याची खबर सुदर्शनला लागली होती. मला त्याचे अप्रूप वाटले.

  सुदर्शनच्या प्रश्नावर काय प्रत्युत्तर येतेय हे जाणण्यास मी उत्सुक होतो. पापण्या न लवता मी उंबराच्या झाडाकडे नजर रोखून उभा होतो. पण आवाज मागून आला.

 "हम्म.. हम्म... मला बाहेर येऊ दे... सोड मला..." सुदर्शनने आखलेल्या वर्तुळात अडकलेला सुदाम भेसूर आवाजात बोलत होता. त्याचे डोळे किलकील होत होते. नजर एका जागेवर स्थिरावत नव्हती. जिभल्या चाटत तो तोंड विचकत होता. 

 त्याचा आवाज अंगात कापरे भरवण्यासाठी पुरेसा होता. मधुकरराव तर डोळे फाडून ते दृश्य पाहत होते. क्षणात पालटलेली आपल्या मुलाची अवस्था पाहून सुमित्रादेवींच्या डोळयांत आसवे जमा झाली होती. 

 "कोण आहेस तू.. आणि का आलायस इथं... या लहान बालकाच्या मागे का पडला आहेस.. तुझं इथे काही काम नाही.. ताबडतोब निघून जा इथून..." सुदर्शनने त्याच्याकडे पाहून सज्जड दम दिला.

  "मला हाकलणारा तू कोण रे... हे घर माझं आहे.. हे अंगण माझं आहे.. मी कश्याला जाऊ इथून... या मुलानेच सर्वप्रथम माझ्या अंगणात पाय ठेवला.. आता हा मुलगा मोठा झाला की माझा हस्तक बनेल... हीहीहाहाहाहाहा...." सुदामच्या मुखातून त्या पाशवी शक्तीने विजयाचा हुंकार भरला.

 सुदर्शनने माझ्याकडे पाहीले. त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते. मला त्याचे शब्द आठवले, सुदर्शनला थरार निर्माण करणाऱ्या, उत्सुकता ताणून ठेवणाऱ्या गोष्टी आवडत नाहीत. तसल्या प्रकारात एखाद्याच्या जीवावरदेखील बेतू शकतं. त्यामुळे एक घाव दोन तुकडे करणे कधीही चांगले..

 सुदर्शनचा इशारा ओळखून मी वर्तुळाच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. जोपर्येंत ते वर्तुळ शाबूत होतं, तिथे मला काहीच धोका नव्हता.

  "तू सध्या शक्तिहीन आहेस हे आपण दोघे जाणतो. तुझी जवळपास सारी शक्ती या झाडामध्ये बंदिस्त आहे. तुझा फक्त काही अंश या लहान बालकात आहे. तो मोठा होईपर्येंत तू तुझं अस्तित्व त्याच्या शरीरात वाढवू शकत नाहीस. म्हणूनच सुदामच्या शरीरातला तूझा अंश त्याला भरपूर खाण्यासाठी भाग पाडतो. कारण त्याचं शरीर मोठं होणं तुझ्यासाठी आवश्यक आहे. तू आताच इतका उन्माद करतो आहेस तर सुदाम मोठा झाल्यावर काय करशील..? असो, तू सुरुवातीलाच ऐकले असतेच तर मी तुला सोडून दिले असते.. आता वेळ निघून गेली आहे... " सुदर्शनने शेवटचे वाक्य संपविले आणि पिशवीतून मघाच्याच चमत्कारी द्रव्याची मोठी बाटली काढली.

 धीरगंभीर मुद्रेने मंत्र पुटपुटत सुदर्शन उंबराच्या झाडाकडे सरसावला. आसमंतात अंधार दाटून आला होता. जवळ येणाऱ्या सुदर्शनसाठी उंबराच्या झाडाने घात घातला. फांदयाची पानं सळसळली. वाऱ्याचा एक मोठा झोत आला आणि क्षणात ते झाड थोडे मागे जाऊन त्वेषाने सुदर्शनवर झेपावले. उंबराच्या झाडाच्या फांदयानी सुदर्शनला कवटाळून कडकडीत मिठीत दाबण्याचा प्रयत्न केला.. पण तीव्र झटका बसून त्यातल्या काही फांदया अक्षरशः हवेत उडाल्या. सुरुवातीला मोठमोठ्या वल्गना करणाऱ्या त्या उंबराच्या झाडाने माघार घेतली. सुदर्शनच्या गळ्यातील सिद्ध तावीज चमकून उठले.

  सुदर्शनचा चेहरा कठोर बनला होता. पुढच्या क्षणात सुदर्शनने हातातल्या द्रव्याची बाटली झाडाच्या खोडाजवळ रिकामी केली, तेव्हासुद्धा त्याचे मंत्रोच्चार सुरूच होते. बाटलीतल्या द्रव्याचा स्पर्श होताच उंबराच्या झाडातून चित्कारण्याचे आवाज येऊ लागले. कानठिळ्या बसवणाऱ्या त्या आवाजाने वातावरणात प्रचंड तणाव निर्माण केला. दुसऱ्या क्षणाला त्या झाडाने पेट घेतला आणि बघताबघता त्याच्या अवशेषांची राख गळून खाली पडू लागली. किंकाळ्या वाढतच गेल्या. पेटणाऱ्या त्या उंबराच्या झाडातून धुराचे काळे लोट वर पसरू लागले होते. त्यातूनच धूसर होत जाणारी सफेद आकृती स्पष्ट दिसत होती.

 त्याचवेळी मागे वर्तुळात असलेला सुदाम हवेत फेकला गेला. त्याच्या शरीरातला त्या पाशवी शक्तीचा अंश बाहेर पडत वर जाणाऱ्या आकृतिमध्ये मिसळला. मी गाफिल नव्हतोच, या क्षणासाठीच तर मघाशी मी वर्तुळाजवळ आलो होतो. हवेत उडालेल्या सुदामला मी अलगद झेलले.

 वातावरण निवळले तसे मी सुदर्शनचे आभार मानले. एव्हाना त्या कुटुंबाला सर्व प्रकार लक्षात आला होता. सुदाम बराच थकला असल्याने सुमित्रादेवी त्याला घेऊन आत निघून गेल्या. मधुकरराव अपराधीपणाचा भावनेने हात जोडून आमच्याकडे पाहत होते. मधुकररावांनी आभाराचा कार्यक्रम आटोपून आम्हा दोघांना रात्री जेवणासाठी आग्रह केला.

 जेवण उरकून आम्ही रात्री अंगणात निवांत बसलो होतो. तितक्यात मधुकररावांच्या वकिलांचा फोन आला. जेवणाअगोदर सुदर्शनच्या सांगण्यानुसार मधुकररावांनी घराच्या भूतकाळाविषयी त्यांच्या वकिलाकडे विचारणा केली होती. त्यासंबंधीची माहिती कळवण्यासाठीच फोन आला होता.

  मूळ मालकाने मोठ्या हौसेने हे घर बांधले होते. पण त्यात राहण्याचा आनंद तो उपभोगू शकला नाही. घराचे बांधकाम पूर्ण झाले आणि काही दिवसांतच त्यांचा व्यवसाय बुडाला. क्षणात सगळं काही गमावलं. नवं घर गहाण ठेवावं लागलं. पुढे जप्ती आली आणि घरही हातातून सुटलं. बँकेने घर जप्त केलं त्याचदिवशी मूळ मालकाने अंगणातल्या उंबराच्या झाडाला लटकून जीव दिला.

 पण त्यानंतर इथे कुठली अनुचित घटना घडल्याची नोंद नव्हती. जेव्हा मधुकरराव हे घर पाहण्यास आले तेव्हा छोटा सुदाम बालसुलभ कुतूहलाने सर्वप्रथम फाटकातून आत आला.

 "आणि आत दबा धरून बसलेल्या त्या मूळ मालकाच्या आत्म्याने त्याला पच्छाडण्याचा प्रयत्न केला..." सुदर्शनने शेवटचं वाक्य म्हणत प्रसंग पूर्ण केला. 

  मधुकररावांनी सुदर्शनचे पाय धरण्याचा प्रयत्न केला पण सुदर्शनने त्यांना तसे करू दिले नाही. त्यांचा निरोप घेऊन आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. आम्हाला थांबवत मधुकरराव आतमध्ये गेले. थोड्याच वेळात बाहेर येत त्यांनी बळजबरीने आमच्या हाती दोन पाकिटे ठेवली.

 "याला नकार द्याल तर माझा अपमान समजेन मी.." मधुकरराव आग्रह दर्शवित म्हणाले.

 ते पाकीट न उघडता आम्ही दोघे माझ्या घराकडे निघालो.

 "काय मास्तर.. परीक्षेत पास झालो का मी...?" सुदर्शनने खट्याळपने विचारले.

 "अगदी शंभर टक्के... तुम्ही तर कमालच केलीत..."  मी आदरपूर्वक नम्रपणाने त्याला म्हणालो.

  "अहं.. तुम्ही नाही तू... आपल्यात वयाचं फारसं अंतर नाही.. मग बोलताना अंतर कश्याला पाडायचं.." सुदर्शनने मला स्पष्ट सूचना केली.

 मी त्याला नकार तर देऊच शकत नव्हतो. भलेही माझ्या मनात त्याच्याबद्दल कितीही आदर निर्माण झाला असू दे.. पण आता तो माझा मित्र बनला होता.


 तर अशी आमची मैत्री जुळली. पुढे आयुष्यात बरीच वळणे आली आणि आमची मैत्री अधिकाधिक घट्ट होत गेली. हे तर सुरुवातीचे किस्से होते. सुदर्शनची क्षमता आणि त्याची शक्ती याहून कितीतरी पटिंनी अधिक होती.. त्यांची प्रचिती मला लवकरच येणार होती. सुदर्शनचे किस्से एकाहून एक सरस आहेत. वेळ भेटेल तसे तुम्हाला ऐकवीनच.


समाप्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ती वाट दूर जाते | ग्रामीण भयकथा

  "अहा.. ह्ह.. हं सर्जा... अहं अहं अहं.. व्ह राजा.. हिकडं हिकडं.. आरं कुठं बांधाच्या कडंनं जातुयस... ये मधी.. हम. हा.. हा.....

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. enjoynz द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.