एक थरारक अनुभव - फणसाची चोरी | Marathi Horror Story | Marathi Bhaykatha | #bhaykatha | मराठी भयकथा


  गूढ गोष्टींचं मला नेहमीच कुतूहल वाटायचं. त्यामागचं विज्ञान समजण्याचे खटाटोप मी कधीकधी करायचो. जसं की माझ्या गावाबाहेर एका साधूची झोपडी होती. लहानपणी जेव्हा पहिल्यांदा मला त्याबद्दल कळाले तेव्हा मी हटकून तिकडे गेलो होतो. सुरुवातीला बाहेरूनच संपूर्ण झोपडीचं निरीक्षण केले. नंतर नंतर मग साधूच्या हालचाली टिपायचो. बंद झोपडीत त्याच्या कसल्याश्या साधना चालत. तो साधू होता की अघोरी मांत्रिक हे समजण्याचं माझं वय नव्हतं ते.

 बरं, एकदोनदा त्याने मला झोपडीच्या आसपास फिरकताना पाहीले आणि जवळ बोलावलेदेखील होते. पण लहान असल्यामुळे आणि त्याचे जटाधारी केस, भरगोस वाढलेली दाढी, एकूण पेहराव यांमुळे मी निश्चितच घाबरलो होतो. पुन्हा कधीही तिकडे न जाण्याचे मी ठरवले.

 दिवसांवर दिवस जात होते आणि आम्ही मित्रमंडळी वयात येत होतो. सोळासतरा वर्षांच्या आसपासची आमची टोळी.. दिवसभर हुंडारत फिरायचो. कधी माळावर तर कधी जांबळीच्या झाडीकडे मोर्चा वळवायचो. वरच्या डोंगरातला एखादा जरी आंबा पाडाला लागल्याची खबर लागली तर आम्ही मित्र दुसऱ्याच दिवशी त्यावरचे आंबे साफ करायचो.

 डोंगरालगतच्या जमिनीची मालकी गावातल्या काही माणसांची होती आणि गाव डोंगरापासून सुमारे अर्ध्या मैलावर होते. सहसा गावातले कोणी तिकडे यायचे नाही. आमची घरे डोंगरालगतच असल्याने तिथला परिसर म्हणजे आमच्या रोजच्या पायाखालचा असा होता.

 डोंगराच्या पुढे दूरपर्येंत पसरलेल्या माळावर जाण्याच्या पायवाटेवरच एक फणसाचे अवाढव्य झाड होते. आमच्या आवाक्यातल्या परिसरातले ते एकमेव फणसाचे झाड. उन्हाळा संपू लागला की आमचे त्या फणसाच्या झाडावर विशेष ध्यान असायचे. कारण याच दिवसांत तो फणस पाडाला लागायचा.

 एकतर त्या झाडावर भरपूर फणस यायचे. गावात राहणारा मालक क्वचितच कधी तिकडे यायचा त्यामुळे अर्थातच त्या झाडावरचे बहुतांश फणस आम्हाला खावयास मिळायचे. हा पण दिवसाढवळ्या मुद्दाम आम्ही त्या झाडावर चढायचो नाही. काहीही झाले तरी एका अर्थाने ती चोरी होती. पण ते चोरलेले फणस खाण्यात वेगळीच मज्जा होती.

 एका संध्याकाळी अंगणात आमची रोजची मैफिल जमली होती. फणस पाडाला लागल्याचे कानावर पडले होते. त्यामुळे मी, सुधीर, दिलीप आणि मंगेश असे चौघे मिळून तिकडे धाड टाकण्याचे निश्चित केले होते. अर्थात आमची टोळी काही इतकीच नव्हती. अजून बरेच जण होते, पण प्रत्येकाची काम आखून दिली होती.

आम्ही चौघे इतरांहून थोडे मोठे असल्याने रात्री फणसाकडे जायचे, झाडावर चढायचे आणि फणस काढून ते पुन्हा घरापाशी आणायचे, ही मुख्य जबाबदारी आमची होती. त्यापुढे मग त्या फणसांची विभागणी करायचे, लपवण्याच्या जागा निश्चित करायच्या, कोणता फणस लवकर पिकू शकतो याचा अंदाज घेऊन काही फणस गोठ्यातल्या चाऱ्याच्या गंजित तर काही फणस जमिनीत पुरायचे अशी कामे इतरांवर होती.

 तर आमची अशी खलबतं त्या संध्याकाळी आखून झाली होती. रात्री जेवण वगैरे केल्यावर सगळीकडे सामसूम झाले असल्याची खात्री करून आम्ही चौघे डोंगराच्या दिशेला निघालो. दिलीपने एक टॉर्च सोबत आणला होता. सुधीरने मजबूत असा दोर घेतला होता. मंगेशच्या हातात जरासा लांब बांबू होता. रात्रीच्या मोहिमेवर काही इतर धोके उद्भवलेच तर खबरदारी म्हणून हे सर्व सोबत घेतले होते. मी रिकामाच होतो.

 खरेतर आमच्या सगळ्यांमध्ये झाडावर चढण्यात मी तरबेज होतो. त्यात ह्या फणसाच्या झाडावर चढण्यासाठी आठ-दहा फुटापर्येंत कसलाच आधार नव्हता. म्हणून मग आम्हां मुलांनाच एकावर एक थर करावा लागत असे आणि तेव्हा कुठे त्या झाडाची पहीली फांदी हाती येत असे.

 आम्ही वस्ती मागे टाकली तेव्हा दहा वाजून गेले होते. अंधाराला आपलंस करत सगळा परिसर निपचित पडला होता. रातकीड्यांचे आवाज तेवढे नाजूकशी ध्वनीकंपणे उत्पन्न करत होते. अधुनमधून एखाद्या चिटपाखराचा कर्कश आक्रोश तिथल्या शांततेला चिरत जायचा.

 सर्वात पुढे पायवाटेवर टॉर्चचा प्रकाश टाकीत दिलीप चालत होता. मागोमाग मंगेश हातातला बांबू जमिनीवर आपटून इतर प्राण्यांना सावध करत होता. सुधीर आणि मी त्यांच्या मागून पावलं टाकीत होतो. साधारण दोनशे मिटरचे ते अंतर आम्हाला कापायचे होते.

 रात्रीचं तिकडे जात असताना आजूबाजूचा काळाकुट्ट अंधार आम्हाला भीती घालण्याचे काम चोख बजावत होता. त्याच्या सोबतीला घोंगावणारा  वारादेखील होताच. तो मधूनच आपल्या झोताचं प्रमाण कमीजास्त करून वातावरणात एकप्रकारची गुढता आणत होता. आम्ही एकमेकांशी न बोलता शांतपणे मार्गक्रमण करत होतो. उगाच बोभाटा कश्याला करायचा, तिथल्या शांततेत आमचा आवाज बराच दूरपर्येंत गेला असता.

 एव्हाना आम्ही निम्म्याहून अधिक अंतर पार केलेच होते की आमच्या पायवाटेला अतिशय तीव्रगतीने छेदनारी एक सळसळ ऐकू आली आणि आम्ही जागच्या जागच्या थबकलो. सुकलेल्या पालापाचोळ्याचा आवाज तिथल्या तिथे घुमला. काहीतरी वेगाने आमच्यापासून दूर गेल्याचे जाणवले. 

 खरेतर आम्ही फक्त प्रतिक्रिया दिली. सर्वात पुढे दिलीप होता आणि त्यानेच टॉर्चच्या प्रकाशात आम्हाला आडवे जाणारे ते जनावर पाहीले होते. इतक्या वेगाने ते सरपटत गेले की दिलीपला काही सुचलेच नाही. मंगेश बांबू आपटू लागला परंतु तोपर्येंत ते जनावर दूर गुडूप झाले होते.

 काहीशी भीती मनात दाटून आली. अचानक उद्भवलेल्या या प्रकारातून आम्ही जरा सावरतच होतो की, तितक्यात दूरवरून कोल्ह्यांचे विव्हळणे आमच्या कानी पडले. त्यांच्या रडण्यातली भेसूरता इतकी विदारक वाटत होती, की आमचे अंग शहारून उठत होते. नकळत कसलेतरी दडपण उगाच मनावर येऊ लागले होते.

"काय म्हणताय गड्या हो.. म्हाघारी फिरायचं का.. कायतरी अशुभ हुईल आसं दिसतंय.." सर्वात पुढे असलेला दिलीप टॉर्च आमच्या दिशेला वळवत विचारू लागला.

 आम्ही काही प्रतिक्रिया देणार तेवढ्यात मंगेशच म्हणाला..

 "माप शाना हायस लेका.. रातच्याला इक्त्या लांबवर आलूय ते आसच व्हयं.. आता जिभंला गरा लागल्याबिगीर सुटका न्हाय घ्याची.." मंगेशच्या बोलण्यात दांडगा आत्मविश्वास होता आणि आमच्या ढेपळालेल्या मनोधैर्याला सावरण्यास तोच कारणीभूत ठरला.

 मी आणि सुधीरने देखील मागे फिरण्यास नकार दिला. एक विरुद्ध तीन.. दिलीपचा नाईलाज झाला. आम्ही पुन्हा पुढे जायला निघालो पण यावेळी आणखी सावधगिरीने पाय टाकीत होतो.

 चांदण्यांच्या प्रकाशात दुरून फणस दिसत होते. आताश्या आम्ही त्यापासून काही अंतरावर असलेल्या सावाड्याच्या झाडापाशी येऊन पोहचलो. अचानक दिलीपच्या हातातला टॉर्च बंदचालू होऊ लागला. त्याला हातावर आपटत दिलीप तपासू लागला. पायाखालची वाट दिसत नसल्याकारणाने आम्ही तिथेच थांबलो. दिलीप टॉर्चची बॅटरी काढून पुन्हा टाकू लागला.

 मी आणि सुधीर मागून इतरत्र पाहत निरीक्षण करत होतो. मंगेश सावाड्याच्या झाडाला टेकून आपला बांबू नाचवीत होता. इतक्या अंधारातही त्याला मस्ती सुचत होती. दिलीपने टॉर्च पुन्हा सुरु केला आणि मिट्ट काळोखात हरवलेली आमची वाट पुन्हा दिसू लागली.

 तितक्यात अंगावर पाल पडल्यासारखा मंगेश दचकला. आम्ही तिघे सावध होऊन त्याच्याकडे पाहू लागलो.

 "काय रं मंग्या.. दचकाय काय झालं.." मी विचारले.

 मंगेश अजूनही बावचळल्यासारखा एकटक हातातील बांबूकडे पाहत होता. मग एकदम बांबूचं दुसरं टोक त्याने वर केलं आणि सर्रकन घसरत आलेली ती जुनाटशी माळ त्याच्या गळ्यात येऊन स्थिरावली. बहुधा सावाड्याच्या वरच्या फांदीवर कुणीतरी मुद्दाम अडकवली असावी.

 आमच्याकडे चमत्कारी नजरेने पाहत मंगेश बोलू लागला.

  "हाहाहा.. आता माझ्याकडं जादूची शक्ती आलीया.. बोला काय इच्छा हाय तुमची.."

 त्याच्याकडे पाहून सुरुवातीला तर आम्हाला घामंच फुटला होता. पण त्याचा खोडकर स्वभाव माहीत असल्याकारणाने आम्ही लवकरच मन शांत केले.

 "अय मंग्या.. याळ घालवू नगोस.. चाल पटापट.." सुधीर म्हणाला.

 दिलीपने दुर्लक्ष करत पुढची वाट धरली आणि त्याच्या मागून आम्ही गपचूप फणसाच्या झाडाकडे जाऊ लागलो. तिथून फणसाचे झाडं फार दूर नव्हते. काही अवधीतच आम्ही तिथे पोहचलो.

 फणसाच्या झाडाखाली उभे राहून दिलीप वरच्या फांदयावर टॉर्चचा प्रकाश टाकत होता. आम्ही तिघेही वर पाहत निरीक्षण करत होतो. सहज मिळण्याजोगे पाचसहा फणस नक्की केल्यावर झाडावर चढण्यासाठी मी पुढे सरसावलो. पण तितक्यात मंगेश पुढे आला आणि बोलू लागला.

  "निल्या.. आज मी चढणार झाडावर.."

 यावर आम्ही तिघेही नवल करु लागलो. खरेतर मंगेश नेहमीच झाडावर चढण्यासाटगी घाबरायचा आणि आज एकदम त्या विपरीत जाऊन तो झाडावर चढण्याचा हट्ट करत होता. पण हे साधेसुधे झाड नव्हते. याची मुख्य फांदीच सुमारे आठ दहा फुटावर होती.

 "मंग्या.. पुन्हा कधीतरी.. दिवसाचं चढ तू.. आज निल्याला जाऊ दे वर.." सुधीर मंगेशला समजावू लागला.

 "न्हाय न्हाय.. ते काय जमायचं न्हाय.. आज मीच चढणार झाडावर.." मंग्या इरेला पेटला होता.

 आम्हाला कळत नव्हते की एकाएकी मंगेशमध्ये असा बदल कसा काय झाला. मी दिलीप आणि सुधीरला खुणावले की जाऊ दे, चढू दे त्याला वर..

 खाली झाडाच्या खोडाला घट्ट पकडून आम्ही मंगेशला उचलून घेतले. आमच्या हातांचा आणि खांद्याचा आधार घेत मंगेश वर चढू लागला तर खरा.. पण खाली आमची परिस्थिती बिकट होऊ लागली. वर उचलण्यासाठी मंगेश शरीराने दिसतो तेवढा काही सोपा नव्हता. त्याचं वजन बरंच वाटत होतं. इतकं की आणखी थोडा वेळ जरी गेला असता तरी आम्ही मटकन खाली बसलो असतो.

 पण तसे काही झाले नाही.. मंगेश कसाबसा वर चढला.. दिलीप टॉर्चचा प्रकाश त्याच्या भोवताली टाकून मंगेशला पुढे जाण्यास सुलभ करत होता. मी आणि सुधीर श्वास रोखून वर पाहत होतो. वर गेलेल्या मंगेशच्या वर्तनात आम्हाला अधिकचं बदल जाणवू लागला. तो वेड्यावाकड्या हालचाली करत फणसापाशी पोहचत होता. मध्येच आमच्याकडे पाहून कसलेसे इशारे करत होता.

 दिलीप त्याच्यावर टॉर्च रोखून होता. शांततेत आणि लवकरात लवकर काम पूर्ण करावं म्हणून आम्हीदेखील त्याला समजावत होतो. पण मंगेश फक्त हसून प्रतिक्रिया देत होता. आम्हाला वाकुल्या दाखवत होता.

 एकाएकी काय झाले कुणास ठाऊक पण त्याच्या तसल्या वर्तनाने त्याचा तोल गेला आणि तो झाडावरून थेट खाली पडला. आम्ही काही हालचाल करावी तोपर्येंत जमिनीवर 'धप्प' असा आवाज आला.

 अकस्मात दूरच्या वाटेवरून पुन्हा कोल्हेकुई ऐकू आली. मंगेशला सावरण्यासाठी पुढे आलेलो आम्ही त्याला हात देणारच होतो की.. त्याला पाहून धक्का बसल्यासारखे आम्ही जागच्या जागी थिजून गेलो. 
दूरवरील कोल्ह्यांच्या त्या भेसूर रडण्यात आता आणखी एक आवाज सामील झाला होता.

 खाली जमिनीवर ओणवा पडलेला मंगेशच्या घश्यातून त्या कोल्ह्यांप्रमाणे विव्हळने बाहेर पडत होते. याला एकाएकी झाले तरी काय.. आमच्या मनात हाच प्रश्न उसळी घेत होता. पण ती वेळ काही निष्कर्ष काढण्याची नव्हतीच. समोर मंगेशचे ते भयानक वर्तन पाहून आम्ही फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. कोल्हेकुई सुरु असेपर्येंत तो प्रकार आम्ही चुपचाप सहन केला. त्यानंतर मात्र शांत होत मंगेश सफाईने उठून उभा राहीला... आश्चर्य म्हणजे झाडावरून पडूनसुद्धा त्याला काहीच दुखापत झाल्याचे वाटत नव्हते.

  घडला प्रकार खरंच इतका विचित्र वाटत होता की दिलीप, सुधीर आणि मी आतून प्रचंड घाबरलो होतो. परंतु चेहऱ्यावर तसं काहीच न दाखवता आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला.. अर्थात मंगेशला न विचारताच.. तो नाहीतरी आपल्याच धुंदीत हरवला होता. कसेबसे त्याला घेऊन आम्ही पुन्हा घराकडे आलो. परत येताना मनात नाही नाही त्या शंका येत होत्या. पण सुदैवाने तसे काही घडले नाही. मंगेशला त्याच्या घरी सोडून आम्ही आपापल्या घरी झोपायला गेलो. 

अस्वस्थ मनामुळे झोप लवकर आली नाही. ती रात्र तळमळतच पार पडली. पहाटे पहाटे कसाबसा डोळा लागला.

 जाग आली ती दिलीपच्या हाकांनीच. सकाळी सकाळी दिलीपला समोर पाहून मी खडबडून जागा झालो. त्याने घाईतच मंगेशकडे जायचे असल्याचे सांगितले. गडबडीत शर्ट घालून मी निघालो.

 मंगेशच्या घरी पोहचलो तर अख्ख्या वस्तीतली माणसे दाराबाहेर हजर होती. सुधीरदेखील आमची वाट पाहत बाहेर उभा होता. बहुधा आमची विचारपूस करण्यासाठी तिथे बोलावले होते. नक्कीच काहीतरी अनुचित प्रकार घडला होता. कालचा प्रसंग आठवून माझ्या अंगावर काटा आला. गर्दीतून वाट काढत आम्ही त्याच्या घरात गेलो तर त्याची आई आमच्या अंगावर धावून आली.

 "कुठं गेला व्हतासा रातच्याला.. पोराचं आंग तापलंय बघा कसलं.." तिने ओरडतच आम्हाला जाब विचारला.

 मंगेश जमिनीवर आडवा पडून असंदीग्ध बडबड करत होता. मध्येच खळखळून हसायचा.. तर मध्येच एखादं विव्हळणं..

 आम्ही मान खाली घालून गप्प बसलो होतो. तेवढ्यात सुधीरला मंगेशच्या गळ्यातली माळ दिसली. एकाएकी त्याला काय वाटले कुणास ठाऊक.. तो धावत मंगेशच्या गळ्यातली माळ काढण्यासाठी गेला आणि झटका बसल्यासारखा तो मागे फेकला गेला.

 ती माळ साधीसुधी नव्हती, याचा अंदाज आम्हाला  तेव्हाच आला. काहीतरी अक्षम्य असा अपराध आपल्या हातून घडला असल्याचे मला जाणवले. तिथं उपस्थित सगळेच जण हतबल होते. कसं काय माहीत पण मला गावाबाहेरचा तो साधू आठवला. क्षणाचाही विचार न करता मी एकटाच तिथून बाहेर पडलो आणि गावाबाहेरच्या दिशेने जात थेट साधूची झोपडी गाठली.

 प्रसन्न चेहऱ्याने जणू ते माझी वाटच पाहत असावेत. मला पाहताच त्यांनी आत बोलावले. यावेळी मी जराही न घाबरता आत जाऊन सर्व प्रकार कथन केला. आमचा कालचा प्रताप ऐकून साधूच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले मी पाहीले. त्यांनी तत्परतेने मंगेशकडे जाण्याचा निर्णय घेतला.

 काही वेळातच त्या साधूंनी मंगेशच्या घरात प्रवेश केला. मी त्यांच्या मागोमाग आत गेलो. साधूंनी घरातल्या सगळ्या माणसांना बाहेर जायला सांगीतले. आत साधूंबरोबर फक्त मी, दिलीप, सुधीर आणि खाली आडवा पडलेला मंगेश एवढेच होतो.

 साधूंनी आपले मंत्रौपचार सुरु केले आणि आपल्याकडील एक लाल कापड घेऊन मंगेशच्या गळ्यातली ती माळ काढली. माळ काढताना मंगेश भेसूर आवाजात बडबड करु लागला. हातपाय हलवत डोळे मोठे करून आपला धाक दाखविण्याचा प्रयत्न करु लागला. परंतु साधूंनी आपला उजवा हात त्याच्या कपाळावर ठेवताच तो शांत झाला आणि हळूहळू आपली शुद्ध हरपू लागला.

 काहीवेळात साधूंनी इतर विधी पार पाडले आणि संकट टळल्याची खात्री झाल्यावर त्यांनी मंगेशसोबत आम्हालासुद्धा सुरक्षारक्षक बांधले. दार उघडून कोणाशी काहीच न बोलता साधू आल्यापावली निघून गेले. मंगेशची आईवडील मुलाच्या काळजीने आत आले. मंगेश अजूनही बेशुद्ध होता. त्याचा उतरलेला ताप पाहून त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

 न राहवून मी पुन्हा बाहेर पळालो आणि साधूंना गाठले.

 "महाराज.. ही माळ कसली हाय.." त्यांच्या हातातल्या लाल कापडाकडे बोट दाखवून मी विचारू लागलो.

 साधू तिथेच थांबले आणि माझ्याकडे प्रसन्न चेहऱ्याने पाहून म्हणाले,

 "पोरा.. ही माळ एका भयंकर अश्या चेटकीणीची आहे.. आज तुझ्या मित्राला तिने नेलेच असते बघ.. आता ह्याच्या पुढे काय विचारू नकोस.. ते जाणून घ्यायचं तुझं अजून वय नाही.."

 साधूंच्या शब्दांवर मी गप्प राहण्याचे ठरवले. मी पुढे जाऊन त्यांना नमस्कार केला आणि पुन्हा घराकडे वळलो.

 मंगेश पूर्णपणे बरा झाला. त्यानंतर ते साधू पुन्हा कधीच दिसले नाहीत. कदाचित त्यांचं इथलं काम संपलं असावं. असो, आम्ही आता फणसाची चोरी करायला शक्यतो दिवसाउजेडाचंच जातो. गऱ्यांचा आस्वाद तोही चोरलेल्या फणसाचा यातली मजाच काही निराळी..


 समाप्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ती वाट दूर जाते | ग्रामीण भयकथा

  "अहा.. ह्ह.. हं सर्जा... अहं अहं अहं.. व्ह राजा.. हिकडं हिकडं.. आरं कुठं बांधाच्या कडंनं जातुयस... ये मधी.. हम. हा.. हा.....

© Copyright 2019 मुक्त कथा. All Rights Reserved.. enjoynz द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.